यावल वनविभागाची यशोगाथा’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन सातपुड्याच्या हिरव्यागार वनसंपदेचा प्रेरणादायी प्रवास शब्दबद्ध विश्राम तेले चौगाव: (संपाद...
यावल वनविभागाची यशोगाथा’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन
सातपुड्याच्या हिरव्यागार वनसंपदेचा प्रेरणादायी प्रवास शब्दबद्ध
विश्राम तेले चौगाव:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातपुड्याच्या उत्तुंग पर्वतरांगांमध्ये वसलेल्या हिरव्यागार जंगलांचा, समृद्ध वन्यजीवांचा आणि वनसंवर्धनासाठी झटणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या कार्याचा जिवंत दस्तऐवज ठरलेल्या ‘यावल वनविभागाची यशोगाथा’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
वनसंवर्धनासाठी वनअधिकारी, वनपाल, वनरक्षक, रोजंदारी वनसेवक, वनकर्मचारी तसेच स्थानिक आदिवासी बांवधांनी दिलेल्या योगदानाचा प्रेरणादायी प्रवास या पुस्तकामधून उलगडण्यात आला आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन सहाय्यक वनसंरक्षक (चोपडा) मा. श्री. एम. बी. पाटील, चोपडा वनक्षेत्रपाल मा. श्री. बी. के. थोरात, वैजापूर वनक्षेत्रपाल मा. श्री. विकेश ठाकरे आणि अडावद वनक्षेत्रपाल मा. श्री. प्रशांत साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर, वनकर्मचारी व निसर्गप्रेमींनी पुस्तकाचे कौतुक करत लेखकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
हे पुस्तक केवळ माहितीपर दस्तऐवज नसून सातपुड्यातील सात वनरेंजची जिवंत यशोगाथा असल्याचे मान्यवरांनी सांगितले. चोपडा रेंजमधील शांत वनप्रदेश, वैजापूर व देवझिरी परिसरातील दऱ्याखोऱ्यांमधील जैवविविधता तसेच यावलच्या घनदाट सागवान जंगलातील निलगाय, तळस आणि बिबट्यांच्या अस्तित्वाचा रोमांचकारी अनुभव वाचकांना या पुस्तकातून घेता येणार आहे.
पुस्तकाचे लेखन व संकलन रोजंदारी वनसेवक विक्की राजपूत (सुभाष संजय पाटील), वनरक्षक रोहित पावरा आणि जनार्दन गुट्टे यांनी केले आहे. वनसंवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विक्की राजपूत हे सातत्याने कविता लेखन तसेच विविध जनजागृती उपक्रम राबवत असतात.
सातपुड्याच्या या हिरव्या नंदनवनाचा निसर्गरम्य आणि प्रेरणादायी प्रवास अनुभवण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

No comments