पुण्यात धुमाकूळ घालणारी 'अंदेकर टोळीची' कोयता गँग अहिल्यानगरमध्ये एलसीबी कडून जेरबंद..दरोड्याचा डाव उधळला..४ गावठी कट्टे अन् कारडतू...
पुण्यात धुमाकूळ घालणारी 'अंदेकर टोळीची' कोयता गँग अहिल्यानगरमध्ये एलसीबी कडून जेरबंद..दरोड्याचा डाव उधळला..४ गावठी कट्टे अन् कारडतूसं जप्त!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- पुणे शहरात दहशत माजवून गंभीर गुन्हे करणाऱ्या कुख्यात 'अंदेकर टोळी' च्या कोयता गँगचा दरोड्याचा मोठा डाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि मिलिट्री इंटेलिजन्सच्या संयुक्त सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. अहिल्यानगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ४ सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत,तर एका फरार आरोपीला नंतर अटक करण्यात आली आहे.या कारवाईत पोलिसांनी ४ गावठी कट्टे,१० जिवंत काडतुसे,कोयता,चाकू असा एकूण २,७६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिलिट्री इंटेलिजन्सच्या 'इनपुट'मुळे पोलिसांची तत्परता
२६ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांना मिलिट्री इंटेलिजन्स (साउथ कमांड,अहिल्यानगर) कडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली.भिंगार परिसरातील बुऱ्हानगर रोडवरील मिरावली पहाडाच्या पायथ्याशी काही संशयित इसम घातक अग्निशस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबलेले आहेत,असा हा 'इनपुट' होता.
माहिती मिळताच,पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ,तसेच पोलीस अंमलदार गणेश धोत्रे,सुनील पवार,विष्णू भागवत,शाहिद शेख,प्रकाश मांडगे,बाळासाहेब गुंजाळ आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाकडे कूच केली.पोलीस पथकाने मिरावली पहाडाच्या पायथ्याशी दबा धरून खात्री केली असता,तेथे ५ तरुण संशयीतरित्या उभे असल्याचे दिसले.पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावताच, पोलिसांची चाहूल लागून त्यातील एक जण मोटारसायकलवरून भरधाव वेगात पळून जाण्यात यशस्वी ठरला.मात्र,सतर्क पोलिसांनी इतर ४ आरोपींना घेराव घालून, त्यांचा पाठलाग करत जागेवरच झडप घालून ताब्यात घेतले.मुस्ताक ईक्राहीम शेख (वय २२,रा.कोंढवा,आश्रमनगर, पुणे),विराट उर्फ विल्यम रवींद्र मेहंदळे (वय २६, रा.काकडे वस्ती,कोंढवा,पुणे),समर्थ बाबासाहेब माडळकर (वय १९, रा.काकडे वस्ती,कोंढवा, पुणे),समर्थ राजेंद्र दुधभाते (वय १८, रा.काकडे वस्ती,कोंढवा, पुणे) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे पळून गेलेल्या साथीदाराबाबत चौकशी केली असता,त्याचे नाव आकाश संजय पवार (रा.ब्रह्मतळे, भिंगार,अहिल्यानगर) असल्याचे समोर आले.अटक केलेल्या ४ आरोपींच्या अंगझडतीत सुरुवातीला १ गावठी कट्टा,१ जिवंत काडतूस,कोयता,चाकू आणि मोबाईल असा एकूण १,७१,००० रुपयांचा मुद्देमाल सापडला.याप्रकरणी अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(४), ३१०(५) सह आर्म्स ॲक्ट कलम ३/२५, ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या चारही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस कोठडीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फरार आरोपी आकाश संजय पवार याचा माग काढला. अत्यंत हुशारीने तपास करत पोलिसांनी आकाश पवार याला भिंगार परिसरातून ताब्यात घेतले.त्याची कसून चौकशी केली असता,त्याच्याकडून तब्बल १,५०,००० रुपये किमतीचे ३ गावठी कट्टे आणि ९,००० रुपये किमतीची ९ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.पोलीस तपासात समोर आले आहे की, हे सर्व आरोपी पुण्याच्या कुख्यात 'आदेकर टोळी'चे सक्रिय सदस्य असून शहरात 'कोयता गँग' म्हणूनही सक्रिय होते. या आरोपींवर यापूर्वी पुणे आणि अहिल्यानगर परिसरामध्ये खून, खुनाचा प्रयत्न,बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.या टोळीला अटक केल्यामुळे एका मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश झाला असून,अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे.

No comments