adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"छडीचा धाक की विद्येचा ध्यास :- एक अंतर्यामी प्रवास" "वेताची ती लवचिक काठी, कडाडूनी जेव्हा वाजे पाठी, अज्ञानाचा पडदा फाटे, ज्ञानाची मग उघडती कवाडे..."

 "छडीचा धाक की विद्येचा ध्यास :- एक अंतर्यामी प्रवास" "वेताची ती लवचिक काठी, कडाडूनी जेव्हा वाजे पाठी, अज्ञानाचा पडदा फाटे, ज...

 "छडीचा धाक की विद्येचा ध्यास :- एक अंतर्यामी प्रवास"

"वेताची ती लवचिक काठी, कडाडूनी जेव्हा वाजे पाठी,

अज्ञानाचा पडदा फाटे, ज्ञानाची मग उघडती कवाडे..."

भारतीय संस्कृतीत शिक्षणाला "तिसरा डोळा" मानले गेले आहे.मराठी मातीच्या संस्कृतीत आणि परंपरेत एक म्हण पिढ्यानपिढ्या घुमत राहिली आहे— "छडी लागे छम छम, विद्या येई घम घम". हे केवळ एक वाक्य नसून ते एका कालखंडातील शिक्षण पद्धतीचे सूत्र होते. पण आजच्या आधुनिक युगात, जिथे बालमानसशास्त्राचे नवे कवाडे उघडली आहेत, तिथे या सूत्राचा अन्वयार्थ बदलणे काळाची गरज बनली आहे. छडीचा तो 'छम छम' नाद खरोखरच विद्येचा 'घमघमाट' पसरवतो का, की अज्ञानाच्या अंधकारात भीतीची नवी भिंत उभी करतो? यावर सखोल चिंतन करणे आवश्यक आहे.

     जुन्या काळी 'गुरू' हेच विद्यार्थ्याच्या आयुष्याचे शिल्पकार मानले जात. गुरुजींनी मारले तरी ते मुलाच्या भल्यासाठीच आहे अशी पालकांची ठाम धारणा होती. पाठांतर न होणे, अक्षराचे वळण नीट नसणे किंवा खोडकरपणा करणे यावर छडी हाच एकमेव उपाय समजला जाई. शिक्षकांचा दरारा इतका असे की छडीचा फक्त आवाज झाला तरी मुले अभ्यासाला बसत. यामागे भीती पेक्षा "शिस्त" लावण्याचा उद्देश अधिक होता.ज्याप्रमाणे एखाद्या पाषाणाला मूर्तीचे रूप देण्यासाठी छिन्नी-हातोड्याचे घाव सोसावे लागतात, तद्वतच विद्यार्थ्याच्या अजाण मनाला पैलू पाडण्यासाठी 'छडी' हे एक आवश्यक साधन मानले जाई. "विद्या विनयेन शोभते" असे मानणाऱ्या समाजात विनयासोबतच 'वचक' (शिस्त) महत्त्वाची होती. त्याकाळी शिक्षकांची छडी म्हणजे केवळ शिक्षेचे अस्त्र नव्हते, तर ती कर्तव्याची जाणीव करून देणारी एक 'समिधा' होती. पूर्वीच्या काळी शिक्षणात शिस्तीला आणि शिक्षकांच्या धाकाला अत्यंत महत्त्व होते. पण आजच्या आधुनिक काळात या विचाराची प्रासंगिकता बदलली आहे.


*"नको छडीचा धाक आता,*

 *नको भीतीचे सावट,*

 *मायेच्या या स्पर्शानेच,*

 *दरवळू दे विद्येचा घमघमाट...."*


इतिहासाची पाने उलटली की आपल्याला निराळेच सत्य उमजते. साने गुरुजींसारख्या ऋषीतुल्य शिक्षकाने कधीच छडीचा वापर केला नाही. "मुले ही देवाघरची फुले आहेत," असे मानणाऱ्या गुरुजींनी स्वतः कष्ट सोसून, उपवास करून मुलांना प्रेमाची आणि माणुसकीची शिकवण दिली. जेव्हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अज्ञानाच्या भिंती फोडण्यासाठी निघाल्या, तेव्हा लोकांनी त्यांच्यावर दगड-धोंड्यांचा मारा केला. तो मार सोसूनही त्यांनी मायेची छडी हातात धरली आणि स्त्री-शिक्षणाचा पाया रचला. या थोर व्यक्तींनी हे सिद्ध केले की, खरी विद्या ही धाकातून नाही, तर समर्पणातून येते.

साहित्यिक भाषेत सांगायचे तर, विद्या ही एका सुगंधी वेलीसारखी आहे. या वेलीला छडीचा 'आधार' जरूर हवा, पण तो आधार तिला ठेचण्यासाठी नसावा. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या माठाला योग्य आकार देण्यासाठी बाहेरून हाताचे फटके मारतो,पण आतून मायेचा आधार देतो; तसेच शिक्षकांची छडी ही मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी असावी, त्यांना दुखावण्यासाठी नाही. छडीने पाठांतर होईल, पण अंतरात्मा प्रज्वलित होणार नाही. सोन्याला अग्नीची झळ लागते तेव्हाच त्याचे तेज उजळते, पण तो अग्नी सोन्याला भस्म करण्यासाठी नसून त्याला शुद्ध करण्यासाठी असतो. तसेच, शिक्षणातील शिस्त ही जाचक नसावी, तर ती विद्यार्थ्याला 'स्वयंशिस्तीकडे' नेणारी असावी.आज आपण 'आनंददायी शिक्षणा'च्या युगात आहोत. आज छडीची जागा 'तंत्रज्ञानाने' आणि 'संवादाने' घेतली आहे. मानसशास्त्र सांगते की, भीतीमुळे बुद्धीची कवाडे बंद होतात, तर कुतूहलामुळे ती विस्तारतात. आज गरज आहे ती अशा शिक्षणाची, जिथे विद्यार्थ्याला प्रश्न विचारताना भीती वाटणार नाही. 'छडी लागे छम छम' ऐवजी जेव्हा विद्यार्थ्याला शिक्षणाची 'गोडी लागे छम छम', तेव्हाच खऱ्या अर्थाने ज्ञानाचा सुगंध सातासमुद्रापार दरवळेल."इतिहास साक्षी आहे की, केवळ छडीच्या धाकाने कोणी विद्वान होत नाही. साने गुरुजींची माया, सावित्रीबाईंचा सोशिकपणा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानाची तहान जेव्हा एकत्र येते, तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने सुसंस्कृत होतो. 'छम छम' वाजनारी छडी कदाचित तात्पुरते पाठांतर करून घेईल, पण महापुरुषांच्या चरित्रातून मिळणारी प्रेरणा विद्यार्थ्याच्या आयुष्यात अनंत काळपर्यंत ज्ञानाचा 'घमघमाट' दरवळत ठेवते."

विद्या ही दहशतीच्या वातावरणात कधीच बहरत नाही; ती फुलते केवळ विश्वासाच्या आणि प्रेमाच्या मातीत! छडीचा दरारा संपला तरी चालेल, पण शिक्षणाबद्दलचा 'आदर' आणि 'शिस्त' मात्र टिकली पाहिजे.भीतीमुळे गुरु शिष्यांच्या नात्यातील ओलावा आणि संवाद हरवतो. आधुनिक शिक्षण पद्धतीत "आनंददायी शिक्षण" यावर भर दिला जातोय खेळ,प्रयोग,कथा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना अभ्यासाकडे वळवले जात आहे.जेव्हा शिक्षक आपल्या शब्दांनी आणि कर्तृत्वाने विद्यार्थ्याच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने ही म्हण सार्थ ठरेल — पण ती वेगळ्या रूपात. चला, तर आपण सर्व मिळून छडीचा धाक सोडूया आणि विद्येचा हा अनमोल सुगंध घराघरात पोहोचवूया... 


📚✒️ लेखन:- श्री संजय ठाकुर सर

उपशिक्षक जे ई स्कूल

No comments