रूपालीताई चाकणकरांच्या अडचणीत वाढ, भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीचे समन्स (नाशिक जिल्हा) रणजित मस्के प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गायक...
रूपालीताई चाकणकरांच्या अडचणीत वाढ, भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीचे समन्स
(नाशिक जिल्हा) रणजित मस्के प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्यावर खंडणी रॅकेट चालवत विविध बँक खात्यांच्या माध्यमातून ७० कोटींपेक्षा अधिक रक्कम बळकवल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात खरातच्या शिवनिका ट्रस्टशी संबंधित व्यवहारांचीही चौकशी सुरू आहे. या ट्रस्टमध्ये रूपाली चाकणकर या विश्वस्त म्हणून कार्यरत होत्या.
या पार्श्वभूमीवर पदाचा गैरवापर करून कोणते आर्थिक व्यवहार झाले का, याचा तपास ईडीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात चाकणकर यांची भूमिका काय होती, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, यापूर्वी या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रूपाली चाकणकर यांची सुमारे पाच तास चौकशी केली होती. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवरही या प्रकरणाची छाया पडली असून बहीण प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
आता ईडीच्या समन्सनंतर रूपाली चाकणकर यांना चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याने या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागून आहे.

No comments