चोपडा तालुक्यात जनगणनेला सुरुवात डिजिटल पद्धतीने होणार घर यादी व घरगणना; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हे...
चोपडा तालुक्यात जनगणनेला सुरुवात
डिजिटल पद्धतीने होणार घर यादी व घरगणना; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- तालुक्यातील सर्व गावांमध्ये आजपासून घर यादी व घरगणना या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी तालुक्यात ६० पर्यवेक्षक आणि ३६२ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून मोबाईल फोनच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने घरांची माहिती संकलित केली जाणार आहे. जनगणना ही लोकशाहीची पायाभरणी मानली जाते आणि तिचे महत्त्व भारताच्या संविधानात अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन पर्यवेक्षक व प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या टप्प्यात तालुक्यातील सर्व गावांतील प्रभाग, वस्त्या, वाड्या तसेच तांड्यांमध्ये गृहभेटी देण्यात येणार आहेत. यावेळी घरातील व्यक्तींची माहिती, इमारतीची माहिती तसेच कौटुंबिक माहिती मोबाईलद्वारे थेट सर्व्हरवर पाठविण्यात येणार आहे.
१ ते १५ मे दरम्यान ज्या नागरिकांनी स्वगणना केली आहे, त्यांच्याकडून ११ अंकी आयडी क्रमांक घेऊन जनगणना प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तर ज्या नागरिकांनी स्वगणना केलेली नाही किंवा ज्यांना ती करता आली नाही, त्यांची संपूर्ण माहिती प्रगणकांकडून १ ते ३३ प्रश्नांच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांकडून कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पडताळणी किंवा निरीक्षणासाठी मागणी केली जाणार नाही. तसेच नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता योग्य आणि अचूक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जनगणनेतील सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
घर यादी व घरगणना कालावधीत तालुक्यातील प्रत्येक गावाच्या लोकसंख्येनुसार साधारणतः २०० कुटुंबांमागे एक प्रगणक नियुक्त करण्यात आला आहे. तसेच सहा प्रगणकांच्या देखरेखीकरिता एक पर्यवेक्षक नेमण्यात आला आहे. भारतामध्ये जनगणना प्रक्रिया १८७२ पासून सुरू असून दशकातून एकदा नियमितपणे जनगणना केली जाते. स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना असून ती पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होत आहे. डिजिटल जनगणनेमुळे प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. जनगणनेच्या माहितीच्या आधारे देशाच्या भविष्यकालीन विकासाचे आणि विविध योजनांचे नियोजन केले जाते. त्यामुळे सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन जनगणना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments