आर टी आय कार्यकर्ते महादेव साठे यांच्या पाठपुराव्याला यश; नान्नज तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या कारभाराची चौकशी सुरू कर्जत-जामखेड प्रतिन...
आर टी आय कार्यकर्ते महादेव साठे यांच्या पाठपुराव्याला यश; नान्नज तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या कारभाराची चौकशी सुरू
कर्जत-जामखेड प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात आर टी आय कार्यकर्ते महादेव अरुण साठे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. संबंधित कार्यालये वारंवार कार्यालयीन वेळेत बंद राहत असल्याबाबत तसेच अधिकारी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याबाबत त्यांनी पुराव्यासह तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी कर्जत-जामखेड नितीन पाटील यांनी तहसीलदार जामखेड यांना नान्नज येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या स्पष्ट आदेशानुसार संबंधित अधिकारी यांनी त्यांच्या सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात कार्यालयांना कुलूप लावून अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत राहत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना 7/12 उतारे, फेरफार, विविध दाखले, वारस नोंदी तसेच इतर महसुली कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची नागरिकांची तक्रार होती.
आर टी आय कार्यकर्ते महादेव अरुण साठे यांनी या प्रकरणात पुराव्यानिशी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात आर टी आय कार्यकर्ते महादेव अरुण साठे यांनी सांगितले की, “सामान्य नागरिकांना वेळेवर महसुली सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळेच मी पुराव्यासह तक्रार केली होती. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याने नागरिकांना न्याय मिळेल तसेच कारवाई कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.”

No comments