महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कांशीरामजी यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट..'त्या' विकृत डॉक्टरवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा.....
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कांशीरामजी यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट..'त्या' विकृत डॉक्टरवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा..!'पीपल्स रिपब्लिकन पार्टी' आक्रमक..पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- सोशल मीडियावर महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीरामजी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानजनक पोस्ट करणाऱ्या पारनेर तालुक्यातील एका डॉक्टर विरोधात अहिल्यानगरमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.या विकृत प्रवृत्तीचा निषेध करत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष आयु.सुमेध भैय्यासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासनाला कडक कारवाईसाठी निवेदन देण्यात आले.पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील डॉ.मंगेश बेकारसे या व्यक्तीने सोशल मीडियावर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीरामजी यांच्याविषयी जातीद्वेष पसरवणारी आणि अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि सुजाण नागरिकांच्या मनात राग निर्माण करणे,याच हेतूने ही पोस्ट करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सदर संशयित हा पेशाने 'डॉक्टर' आहे.एका सुशिक्षित आणि जबाबदार व्यक्तीने अशा प्रकारे जाहीरपणे समाज विघातक वक्तव्य केल्याने समस्त समाजबांधवांच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या आहेत.त्यामुळे अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीची डॉक्टर म्हणून असलेली 'वैद्यकीय सनद' (License) तातडीने रद्द करण्यात यावी,यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत.
संबंधित डॉक्टरवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी.संशयित डॉक्टरकडून तक्रारदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे,तरीही पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कायदेशीर कारवाई करावी.जर या प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही, तर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध भैय्यासाहेब गायकवाड, गौतमीताई भिंगारदिवे,सागर ठोकळ,विशाल गायकवाड, किरण गायकवाड,सागर ढगे, दीप भाकरे,अनिकेत विधाते, शांतवण साळवे आणि सिद्धार्थ राजगुरु यांच्यासह अनेक कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments