भुसावळात फायर सेफ्टी प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह; अग्निशमन विभागाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायक...
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ:- शहरातील नगरपालिका अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पदाचा गैरवापर करत कथितरीत्या अनधिकृत फायर सेफ्टी प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची समक्ष भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केला आहे.
माहितीनुसार, भुसावळ नगरपालिका अग्निशमन विभागातील अधिकारी प्रशांत भोळे व संबंधित कर्मचाऱ्यांनी दि. 29 एप्रिल 2025 रोजी बियाणी फार्मसी कॉलेज, गट नं. 96/1, मिरगव्हाण शिवार, जामनेर रोड, भुसावळ येथील संस्थेला फायर सेफ्टी सर्टिफिकेट दिल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. तसेच अशा प्रकारची अनेक प्रमाणपत्रे विभागाकडून देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सदर महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व प्राध्यापकांची वर्दळ असते. त्यामुळे नियमबाह्य किंवा चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र देण्यात आले असल्यास भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तक्रारीनुसार, फायर सेफ्टी सर्टिफिकेट देण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाने प्राधिकृत केलेल्या मालेगाव येथील फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस विभागाला देण्यात आलेला आहे. असे असताना भुसावळ नगरपालिका अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्रे देऊन आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय नगरपालिका हद्दीत तसेच हद्दीबाहेरील विविध ठिकाणी अशा प्रकारची प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी तसेच चौकशी अहवालाची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केदार सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


No comments