adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगरपरिषदेत शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न नगराध्यक्षा नम्रता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासन सज्ज

चोपडा नगरपरिषदेत शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न नगराध्यक्षा नम्रता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली...

चोपडा नगरपरिषदेत शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

नगराध्यक्षा नम्रता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासन सज्ज 


चोपडा प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक 1 जानेवारी 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात तसेच आवश्यक पूर्वतयारीबाबत चोपडा नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्षा नम्रता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीत शासन निर्णयातील विविध तरतुदींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रशासनाकडून माहिती देण्यात आली की, दिनांक 1 जानेवारी 2011 पर्यंत अस्तित्वात असलेली 500 चौ. फूट पर्यंतची निवासी अतिक्रमणे विनामूल्य नियमित करण्यात येणार आहेत. तसेच 500 चौ. फूट ते 1500 चौ. फूट पर्यंतच्या निवासी अतिक्रमणांसाठी प्रचलित बाजारमूल्याच्या 10 टक्के रक्कम आकारली जाणार असून, निवासी जागेचा काही भाग व्यावसायिक वापरासाठी असल्यास प्रचलित बाजारमूल्याच्या 25 टक्के रक्कम आकारून अतिक्रमण नियमित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. बैठकीदरम्यान नगराध्यक्षा नम्रता पाटील तसेच उपस्थित नगरसेवकांनी शासन निर्णय, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत विविध शंका उपस्थित केल्या.  


प्रशासनाच्या वतीने सर्व प्रश्नांचे समाधान करत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी शहरातील विविध भागांत विशेष कॅम्प आयोजित करणे, माहितीपत्रकांचे वितरण करणे, दवंडीच्या माध्यमातून जनजागृती करणे तसेच नगरपरिषद कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. पात्र लाभार्थ्यांना सहज, पारदर्शक आणि वेळेत लाभ मिळावा यासाठी प्रशासनामार्फत व्यापक जनजागृती आणि मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीस नगराध्यक्षा, नगरसेवक, मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी शहरातील पात्र नागरिकांना शासन निर्णयाचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. “शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या महत्त्वपूर्ण संधीचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नियमानुसार मदत कक्षात अर्ज सादर करावेत,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रशासनाला पारदर्शक, सुलभ आणि वेळेत प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देत सर्वांनी सहकार्य करण्याचेही त्यांनी नमूद केले.

No comments