शासनाच्या नियमितीकरण योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी प्रभाग क्र. ३ मधील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी नगरसेवक ईश्वर अलकरी य...
शासनाच्या नियमितीकरण योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी
प्रभाग क्र. ३ मधील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी नगरसेवक ईश्वर अलकरी यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मधील रामपुरा, मेहतरवाडा, पंचशील नगर, अलकरी वाडा, पारधी वाडा, भिल वाडा, समता नगर तसेच कुंभारटेक परिसरातील शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमणे शासनाच्या निर्णयानुसार नियमित करण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक श्री. ईश्वर युवराज अलकरी यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक पुराव्यांसह अर्ज स्वीकृती, छाननी, मोजणी प्रक्रिया, हरकती व अंतिम मंजुरीची प्रक्रिया राबविण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुमारे ३०० घरे शासकीय जागेवर निवासी अतिक्रमण करून वास्तव्यास असल्याचे सांगत हा भाग झोपडपट्टी स्वरूपाचा असल्याने नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचे नगरसेवक अलकरी यांनी नमूद केले आहे. संबंधित रहिवाशांकडून नियमानुसार शुल्क भरून अर्ज स्वीकारण्यात यावेत व त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

No comments