गव्हाच्या दाण्यावर महाराष्ट्र दिनाची मायक्रो पेंटिंग साकारून जागतिक विक्रमवीर कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांचा डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते भव्...
गव्हाच्या दाण्यावर महाराष्ट्र दिनाची मायक्रो पेंटिंग साकारून जागतिक विक्रमवीर कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांचा डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते भव्य सत्कार
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र दिनानिमित्त गव्हाच्या एका सूक्ष्म दाण्यावर अप्रतिम मायक्रो पेंटिंग साकारून आपल्या अद्वितीय कलाकौशल्याची जागतिक स्तरावर छाप पाडणारे !उपक्रमशील कलाशिक्षक, चित्रकार तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, ओ.एम.जी. नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड लंडनचे मानकरी सुनिल दाभाडे यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते डॉ. सुधीर तांबे साहेब यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. आमदार सत्यजित तांबे यांचे वडील तसेच लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे म्हणून परिचित असलेल्या डॉ. सुधीर तांबे साहेबांनी सुनिल दाभाडे यांच्या कलात्मक जिद्दीचे, बारकाईचे आणि महाराष्ट्रावरील प्रेमाचे विशेष कौतुक केले. गव्हाच्या दाण्यासारख्या सूक्ष्म माध्यमावर महाराष्ट्र दिनाची कलाकृती साकारून त्यांनी कला, संस्कृती आणि राज्याभिमानाचा अनोखा संगम घडविल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
या प्रेरणादायी सोहळ्यास शाळेच्या प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन सुनिल दाभाडे यांचा सन्मान करत त्यांच्या जागतिक विक्रमांची दखल घेतली. सुनिल दाभाडे यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे केवळ शाळेचेच नव्हे तर संपूर्ण जळगांव जिल्ह्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे. त्यांच्या कलेतील नावीन्य, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे व्यक्तिमत्त्व यामुळे उपस्थितांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कला क्षेत्रात सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या कलावंताचा सत्कार सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणा, अभिमान आणि आनंदाचा अविस्मरणीय क्षण ठरला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया ,मानद सचिव विश्वनाथ जोशी ,सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सुनिल दाभाडे यांचे कौतुक केले.

No comments