केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून दिलासा. पण शासकीय मदतीसाठी जिल्हा व तालुका प्रशासन निद्रिस्त ! प्रशांत डिक्कर. अमोल बावस्कार बुलढ...
केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून दिलासा.
पण शासकीय मदतीसाठी जिल्हा व तालुका प्रशासन निद्रिस्त ! प्रशांत डिक्कर.
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा:- तालुक्यात वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा जळून खाक झाल्या असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले आहे, डिक्कर यांनी संबंधित विभागाला वेळोवेळी दिलेल्या निवेदनात दि .९ मे रोजी चक्रीवादळात नुकसान झालेल्या केळीच्या बागांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या दबावानंतर, तालुका कृषी अधिकारी (तेल्हारा) यांनी लेखी पत्राद्वारे कळवले आहे की, 'पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजने'च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एप्रिल महिन्यात सलग ५ दिवस तापमान ४२°C पेक्षा जास्त राहिल्याने तेल्हारा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी ४२,५०० रुपये प्रति हेक्टर विम्यास पात्र आहेत. यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
विमा हा शेतकऱ्यांचा हक्काचा आहे, परंतु भीषण उन्हामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीची शेतकरी प्रतिक्षा करीत आहेत, तालुका व जिल्हा प्रशासन निद्रिस्त अवस्थेत असल्याने सरकारने शेतकऱ्यांसाठी अद्याप कोणतेही विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलेले नाही. त्यामुळे केवळ विम्यावर अवलंबून न राहता सरकारने थेट मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत."विमा रक्कम मिळणे हा आमचा अधिकार आहे, पण सरकारने मदतीचा हात आखडता घेतला आहे. जर सरकारने केळी उत्पादकांसाठी तातडीने विशेष पॅकेज जाहीर केले नाही, तर हजारोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे आता प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments