बोगस बियाणे अन् खतांचा काळाबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही.. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा 'थेट' फौजदारीचा इशारा! सचिन मोकळं ...
बोगस बियाणे अन् खतांचा काळाबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही.. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा 'थेट' फौजदारीचा इशारा!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांनो आणि पीक विमा कंपन्यांनो,सावधान..! केवळ परवाने निलंबित करून आता भागणार नाही,तर थेट 'जेलची हवा' खावी लागणार आहे.बोगस बियाणे,खतांचा काळाबाजार आणि शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या विमा कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्याचे कडक आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या 'खरीप हंगाम पूर्व नियोजन' बैठकीत ते बोलत होते.यावेळी त्यांनी कृषी विभागाला स्पष्ट बजावले की, "शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची मेहेरबानी दाखवू नका.खतांसोबत इतर उत्पादनांची सक्तीने विक्री (जोडविक्री) करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करा.विमा परतावा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कडक कायदेशीर पवित्रा घ्या.पारंपरिक युरियाला पर्याय म्हणून 'नॅनो युरिया' आणि 'नॅनो डीएपी'च्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा. राज्याबाहेरून येणाऱ्या बोगस बियाण्यांना रोखण्यासाठी सीमावर्ती भागात पोलिसांच्या मदतीने 'चेक पोस्ट' उभारले जाणार.बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी जिल्ह्याच्या तयारीचा आढावा सादर केला. त्यांनी सांगितले आतापर्यंत ११ हजार तपासण्या पूर्ण करून १०३ केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत.फसवणूक प्रकरणी २ पोलीस केसेस आणि १९ गुन्हे आधीच दाखल झाले आहेत.खतांचा बफर स्टॉक:संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन ५,४०० मेट्रिक टन खताचा राखीव साठा तयार ठेवला आहे. कृषी यांत्रिकीकरण आणि 'PMFME' योजनेत अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
"खतांच्या पिशव्यांवर QR कोड आणि इलेक्ट्रॉनिक विक्री यंत्रणेत पारदर्शकता आणा.प्रत्येक दुकानाबाहेर दराचे फलक दिसलेच पाहिजेत.शेतकऱ्यांची लूट कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही."असे यावेळी डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.या बैठकीला आमदार अमोल खताळ,विठ्ठलराव लंघे पाटील,विक्रमसिंह पाचपुते, खासदार भाऊसाहेब वाकचौरे (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) यांच्यासह प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाच्या माहितीपुस्तिकेचे आणि 'संतुलित खत वापर' पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.

No comments