भुसावळातील संशयास्पद मिळकत व्यवहारांपासून सावध राहा : केदारनाथ सानप यांचे जनतेला आवाहन भुसावळ प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भुसा...
भुसावळातील संशयास्पद मिळकत व्यवहारांपासून सावध राहा : केदारनाथ सानप यांचे जनतेला आवाहन
भुसावळ प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ येथील गट नं.100 सह काही महत्त्वाच्या मिळकती संदर्भात खोट्या व तथाकथित कागदपत्रांच्या आधारे सुरू असलेल्या अनधिकृत व बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहारांपासून सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केले असून याबाबत त्यांनी शासन व संबंधित वरिष्ठ कार्यालयांकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ परिसरात स्वातंत्र्यपूर्व काळात ख्रिश्चन व पारसी समाजाच्या ट्रस्टच्या नावावर अनेक मोक्याच्या जागांवरील महत्त्वाच्या मिळकती अस्तित्वात होत्या. देश स्वतंत्र झाल्यानंतर संबंधित ट्रस्ट निष्क्रिय झाल्याचे दिसून येत असून, भुसावळमध्ये ख्रिश्चन व पारसी समाज अल्पसंख्य असल्यामुळे या अनेक मिळकती आजही लावारिस अवस्थेत पडून आहेत.
या परिस्थितीचा फायदा घेत काही तथाकथित बोगस व्यक्ती खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून संबंधित मिळकतींवर खरेदी-विक्रीचा अधिकार असल्याचा दावा करीत आहेत. तसेच काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हे व्यवहार होत असल्याचेही समोर येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
खडका रोड परिसरातील एका मिळकतीबाबत व्यवहार झाल्याचे समोर आले असून, त्या प्रकरणी न्यायालयात वाद सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे. तसेच तापी नदीकाठावरील गट नं.100 संदर्भात अनिल क्रिस्ट्रोफर नायर या नावाच्या तथाकथित इसमाने मॅसानिक लॉज संस्थेच्या नावावरील मिळकतीसंदर्भात दीपक पितांबर टेकवाणी यांच्या नावाने जनरल मुखत्यारपत्र करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याआधारे ईश्वर श्रीराम पाटील व इतरांना अनधिकृत व बेकायदेशीररीत्या खरेदीखत करून देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर व्यवहार नोंदविताना संबंधित मिळकत या व्यक्तींच्या नावावर कशी आली, त्यांच्या मालकी हक्काचा आधार काय आहे याची शहानिशा न करता, बाजारभावापेक्षा अत्यंत कमी किंमतीत खरेदीखत नोंदविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या संदर्भात केदारनाथ सानप यांनी वकिलामार्फत संबंधितांना नोटीस बजावली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच संबंधित इसम हे सदर मिळकत विक्री करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
त्यामुळे कोणतीही मिळकत खरेदी करण्यापूर्वी त्या मिळकतीचे टायटल, मालकी हक्क व कायदेशीर कागदपत्रांची संपूर्ण खातरजमा केल्याशिवाय व्यवहार करू नये, असे आवाहन केदारनाथ सानप यांनी जनतेला केले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची तक्रार शासन व वरिष्ठ कार्यालयांकडे करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

No comments