गलंगी बसस्टॅन्डजवळील धोकादायक खड्डा वाहनचालकांसाठी ठरतोय जीवघेणा बिर्याणी व नाश्ता सेंटर परिसरात कायम वर्दळ; बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामु...
गलंगी बसस्टॅन्डजवळील धोकादायक खड्डा वाहनचालकांसाठी ठरतोय जीवघेणा
बिर्याणी व नाश्ता सेंटर परिसरात कायम वर्दळ; बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप
मच्छिंद्र कोळी गलंगी, ता. चोपडा :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा ते हातेड राज्यमार्गालगत काही अंतरावर असलेल्या गलंगी येथील बसस्टॅन्डजवळ पडलेला भला मोठा खड्डा आता वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. परिसरात बिर्याणी व नाश्ता सेंटर तसेच फरसाण दुकाने असल्यामुळे येथे रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे या धोकादायक खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हा खड्डा पडलेला असून संबंधित बांधकाम विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे. या मार्गावरून सतत वाहतूक सुरू असल्याने खड्डा अधिक खोल आणि मोठा झाला आहे. परिणामी वाहन काढताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणी लहानशी मोरी असल्यामुळे वाहनांना साईड देण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. समोरून वाहन आल्यास चालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागत असून रोज किरकोळ वाद आणि भांडणे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
चोपडा ते हातेड या मार्गाचे काम करण्यात आले असताना गलंगी बसस्टॅन्ड परिसरातील एवढा मोठा खड्डा मात्र का सोडण्यात आला? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. परिसरातील नागरिक व वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डा बुजवून रस्ता पूर्ववत करावा, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी मागणी केली आहे.

No comments