चोपडा वनक्षेत्रात अवैध अतिक्रमण करणाऱ्या दोघांना ट्रॅक्टरसह अटक; वनविभागाची धडक कारवाई विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोप...
चोपडा वनक्षेत्रात अवैध अतिक्रमण करणाऱ्या दोघांना ट्रॅक्टरसह अटक; वनविभागाची धडक कारवाई
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा: राखीव वनक्षेत्रात बेकायदेशीरपणे प्रवेश करून जमिनीवर अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टरने नांगरणी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना चोपडा वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला बिना नंबरचा जॉन डीयर कंपनीचा ट्रॅक्टर आणि लोखंडी टिलर जप्त करण्यात आला असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये एवढी आहे. ही कारवाई २६ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
रात्रीच्या गस्तीदरम्यान उघडकीस आला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा वनक्षेत्रातील नियतक्षेत्र चौगांव (कक्ष क्र. २६०) मध्ये लासूर येथील राऊंड स्टाफ रात्रीच्या सुमारास पायी गस्त घालत होते. यावेळी त्यांना जंगलातून काही अंतरावर ट्रॅक्टरचा आवाज ऐकू आला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, राखीव वनात बेकायदेशीर रित्या प्रवेश करून जमिनीवर अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने टिलर (नांगरणी) सुरू असल्याचे दिसून आले.
आरोपींना अटक, ट्रॅक्टर जप्त
या कारवाईत वनविभागाने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये लक्ष्मण बुटा बारेला (रा. लासूर, पंपनगर, ता. चोपडा) आणि ट्रॅक्टर चालक राकेश जगदिश बारेला (रा. घोडगांव, ता. चोपडा) अशी आरोपींची नावे आहेत. वन पथकाने घटनास्थळावरून हिरव्या रंगाचा जॉन डीयर कंपनीचा ट्रॅक्टर (५०५० डी) आणि लोखंडी टिलर जप्त करून मुख्य विक्री केंद्र चोपडा येथे जमा केला आहे.
याप्रकरणी चौगांवचे वनरक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ड, ह व कलम ५२ (१) अन्वये वनगुन्हा क्र. ०१/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
सदर धडक कारवाई यावल वनविभाग जळगावचे उपवनसंरक्षक (डीसीएफ) सौरीष सहाय, चोपडाचे सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) महेंद्रकुमार भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) भाईदास कौतिक थोरात, लासूरचे वनपाल जे. पी. सुर्यवंशी, चौगांवचे वनरक्षक पी. एस. पाटील, वनरक्षक मामलदा आर. आर. पाटील, चौगांव उत्तरचे वनरक्षक ए. व्ही. पाटील, लासूरचे वनरक्षक एस. वाय. पाटील व वाहन चालक जी. एस. चौधरी यांच्या पथकाने केली.
अवैध कृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार: वनविभाग
"चोपडा वनपरिक्षेत्रात कोणताही कायदेशीर हक्क नसताना अवैध अतिक्रमण करणे किंवा बेकायदेशीर वृक्षतोड करणे यासारखे वनगुन्हे करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल. सातपुड्याचे गतवैभव आणि निसर्ग संपदेचा नाश टाळण्यासाठी यावल वनविभाग कटिबद्ध आहे. नागरिकांना कुठेही वनगुन्हा आढळल्यास त्यांनी त्वरित १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा."
– बी. के. थोरात (वनपरिक्षेत्र अधिकारी, चोपडा प्रा.)

No comments