adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

देवणी बस स्थानक अंधारात; चोऱ्या, टवाळखोरांचा वाढता त्रास — प्रवाशांकडून तातडीने सुविधांची मागणी

 देवणी बस स्थानक अंधारात; चोऱ्या, टवाळखोरांचा वाढता त्रास — प्रवाशांकडून तातडीने सुविधांची मागणी  लातूर, दि. प्र. / प्रतिनिधी – उत्तम माने (...

 देवणी बस स्थानक अंधारात; चोऱ्या, टवाळखोरांचा वाढता त्रास — प्रवाशांकडून तातडीने सुविधांची मागणी 


लातूर, दि. प्र. / प्रतिनिधी – उत्तम माने

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लातूर जिल्ह्यातील देवणी येथील एसटी बस स्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नव्याने उभारण्यात आलेल्या बस स्थानकाचे लोकार्पण होऊन अवघे एक वर्ष उलटत नाही तोच स्थानकातील बहुतांश लाईट बंद पडल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. या अंधाराचा फायदा घेत मोबाईल, दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरीच्या घटना वाढत असल्याची तक्रार प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

बस स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी चोरट्यांचा व मद्यपींचा वावर वाढला असून महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः बसस्थानकाचे थांबे पूर्व दिशेला असल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे महिलांसह सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी आहे तसेच शौचालयात पाण्याअभावी अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बस स्थानकाची अवस्था “अडचण नसून खोळंबा” अशी झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, बस स्थानक परिसरात काही टवाळखोर व रोडरोमिओंचा वावर वाढल्याने शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. देवणी शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत बस स्थानकात पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्डची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तसेच उदगीर व निलंगा भागातून येणारे काही मटका व्यावसायिक बस स्थानक परिसरातच अवैध मटका व्यवसाय करत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने एसटी प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकार्पणानंतरही बस स्थानकातील उपहारगृह व कॅन्टीन सुरू करण्यात आले नसल्याने प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. त्यामुळे प्रवाशांचा आर्थिक व मानसिक त्रास वाढत आहे.

देवणीकरांनी एसटी महामंडळ प्रशासनाने तातडीने बस स्थानकातील बंद लाईट, पंखे, पाणीपुरवठा, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था सुरळीत करावी, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून अवैध प्रकारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

No comments