चोपडा शहरात मुक्या प्राण्यांवर क्रूरता; २ लाख ५० हजारांचे गोवंश जप्त, एकावर गुन्हा दाखल! काल्पनिक फाईल फोटो चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- ह...
चोपडा शहरात मुक्या प्राण्यांवर क्रूरता; २ लाख ५० हजारांचे गोवंश जप्त, एकावर गुन्हा दाखल!
![]() |
| काल्पनिक फाईल फोटो |
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा: मुक्या प्राण्यांना दाटीवाटीने कोंडून, जखमी करून त्यांची क्रूरपणे छळवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चोपडा शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २ लाख ५० हजार रुपये किमतीचे एकूण ७ गोवंश (गाई आणि बैल) जप्त केले असून, एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिनांक २४ मे २०२६ रोजी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील भोकरवाडा चौकीमागील सार्वजनिक शौचालयाजवळ असलेल्या एका तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्या शेडमध्ये आरोपी मुबारक अली मुजफर अली (वय ३० वर्षे, रा. भोकरवाडा, चोपडा) याने आपल्या मालकीच्या शेडमध्ये एकूण ७ गोवंश, ज्यामध्ये २ गाई (वासरू) आणि ५ गो-हे (बैल) यांचा समावेश आहे, त्यांना अत्यंत दाटीवाटीने आणि जखडून क्रूर रीतीने बांधून ठेवले होते. या प्राण्यांना कोणत्याही प्रकारची चारा-पाण्याची सोय करण्यात आली नव्हती, तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर कानाला टॅग लावलेले नव्हते. प्राण्यांची ही अत्यंत दयनीय अवस्था पाहून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ३० ते ४० हजार रुपये प्रत्येकी किंमत असलेले एकूण ७ गोवंश (किंमत २,५०,००० रुपये) जप्त केले आहेत.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस काँस्टेबल अतुल अनिल मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुबारक अली मुजफर अली याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ड)(च)(ज) प्रमाणे गुन्हा रजि. भाग ६ गुरं. २१९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार दीपक विसावे हे करीत आहेत. चोपडा शहरात बेकायदेशीरपणे आणि क्रूरतेने गोवंश कोंडणाऱ्यांवर पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे प्राणि प्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.

No comments