चोपड्यातून १० बैल चोरणारे दोन अज्ञात चोरटे पसार; ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त, चोपडा शहर पोलिसांची कारवाई काल्पनिक फाईल फोटो चोपडा प...
चोपड्यातून १० बैल चोरणारे दोन अज्ञात चोरटे पसार; ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त, चोपडा शहर पोलिसांची कारवाई
![]() |
| काल्पनिक फाईल फोटो |
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा: शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागलवाडी शिवारातील महादेव मंदिरासमोरील रोडवर, जनावरांना निर्दयतेने डांबून ठेवून त्यांची कोणतीही काळजी न घेता वाहतूक करण्याच्या उद्देशाने जमा केलेल्या दोन अज्ञात इसमांवर चोपडा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ लाख २० हजार रुपये किमतीचे एकूण १० बैल हस्तगत केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे २०२६ रोजी पहाटे ४:०० वाजेच्या सुमारास नागलवाडी गावच्या नाल्याजवळ असलेल्या महादेव मंदिरासमोरील रोडवर दोन अज्ञात इसम संशयास्पद रित्या आढळून आले. आरोपींनी त्यांच्या ताब्यातील विविध जातींचे आणि रंगांचे एकूण १० बैल, अत्यंत क्रूरतेने आणि बेकायदेशीरपणे जवळ-जवळ बांधून ठेवले होते. जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, त्यांना पायी हाकलत असताना पोलीस पथकाला ते मिळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी तेथून पळ काढला.
हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल (बैल): पोलिसांनी घटनास्थळावरून वेगवेगळ्या वयोगटातील आणि रंगांचे एकूण १० बैल जप्त केले आहेत. यामध्ये:
५०,०००/- रुपये किमतीचे प्रत्येकी ७ बैल (गावरान व गीर जातीचे)
३०,०००/- रुपये किमतीचे प्रत्येकी २ बैल
१०,०००/- रुपये किमतीची १ लहान पार्डी
असा एकूण ४,२०,०००/- (चार लाख वीस हजार) रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मदन रतीलाल पावरा (चोपडा शहर पोलीस स्टेशन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन इसमांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर २२०/२०२६ अन्वये प्राणी प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(G)(J) आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (ए), (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पुंडलिक कोळी हे करीत आहेत.

No comments