आगामी सण उत्सव शांततापूर्ण आणि सलोख्याने साजरा करा - पो नि डॉ विशाल जयस्वाल मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आगामी बकरी ईद...
आगामी सण उत्सव शांततापूर्ण आणि सलोख्याने साजरा करा - पो नि डॉ विशाल जयस्वाल
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आगामी बकरी ईद सणानिमित्त शांतता समितीच्या बैठकीत आवश्यक सुचना
रावेर पोलीस प्रशासनाने ईद उल अजहा बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत आगामी सण उत्सव बंधुभावाने आणि सलोख्याने साजरा करण्याचे आवाहन रावेर पोलीस प्रशासनाने केले.यावेळी पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी उपस्थित नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर देत, सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष दक्षता बाळगण्याची माहिती दिली. रावेर शहरासह तालुक्यात आगामी ईद-उल-अजहा (बकरीद) सण शांततापूर्ण आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्याच्या उद्देशाने, रावेर पोलीस ठाण्याच्या परिसरात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या निर्देशानुसार झालेल्या या बैठकीत शांतता समितीचे सदस्य, नगरसेवक आणि समाजातील विविध स्तरांतील लोकांची उपस्थिती होती
बैठकीमध्ये बंधुभाव आणि सलोखा टिकवून ठेवण्यावर भर देण्यात आला
बैठकीत पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी सणासुदीच्या काळात शहरात शांतता आणि परस्पर बंधुभाव राखण्यावर विशेष भर दिला. सर्वांना एकत्र येऊन सण साजरा करण्याचे, कोणत्याही प्रकारच्या वादापासून किंवा तणावापासून दूर राहण्याचे आणि या सणाच्या दिवशी केवळ सरकारी नियम व कायद्यांच्या चौकटीत राहूनच त्याग करण्याचे आवाहन करण्यात आले. पद्माकर महाजन, अशोक शिंदे, गयास शेख, दिलीप कांबळे, अयुब पैलवान यांनी या बैठकीत आपली मते व्यक्त केली आणि अफवा टाळून सतर्क राहण्याचे आवाहन केले. रावेर पोलीस प्रशासनाने लोकांना सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांद्वारे पसरणाऱ्या अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच, कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ प्रशासनाला कळवण्याची विनंती करण्यात आली, जेणेकरून वेळेत आवश्यक कारवाई करता येईल.
पोलीस प्रशासनाची सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष तयारी
उत्सवादरम्यान सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष दक्षता ठेवली जाईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले. संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची निगराणी वाढवली जाईल आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त दल तैनात केले जाईल. या बैठकीला पद्माकर महाजन, उपनगराध्यक्ष आसिफ मोहम्मद, डॉ. संदीप पाटील, अशोक शिंदे, गया शेख, दिलीप कांबळे, महमूद मन्यार, युसूफ खान, अब्दुल रफीक, गयास काझी, निसार कुरेशी यांच्या सह इतर नागरिक उपस्थित होते.


No comments