adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डेंग्यू दिनानिमित्त चोपडा नागरी आरोग्य केंद्रात जनजागृती सभा डेंग्यू, चिकूनगुनिया व मलेरियाबाबत नागरिकांना दिले प्रतिबंधात्मक उपायांचे मार्गदर्शन

डेंग्यू दिनानिमित्त चोपडा नागरी आरोग्य केंद्रात जनजागृती सभा डेंग्यू, चिकूनगुनिया व मलेरियाबाबत नागरिकांना दिले प्रतिबंधात्मक उपायांचे मार्ग...

डेंग्यू दिनानिमित्त चोपडा नागरी आरोग्य केंद्रात जनजागृती सभा

डेंग्यू, चिकूनगुनिया व मलेरियाबाबत नागरिकांना दिले प्रतिबंधात्मक उपायांचे मार्गदर्शन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद यशवंतराव सोनवणे यांच्या सूचनेनुसार तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी आणि नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला व डॉ. सिद्धार्थ साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दिनांक १६ मे २०२६ रोजी जागतिक डेंग्यू दिनानिमित्त चोपडा नागरी आरोग्य केंद्रात जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डासांमुळे होणारे डेंग्यू, चिकूनगुनिया आणि हिवताप या किटकजन्य आजारांविषयी उपस्थित नागरिक व रुग्णांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि हस्तपत्रिकांचे वितरण करून डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. १६ मे हा जागतिक डेंग्यू दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना डेंग्यूसह विविध किटकजन्य आजारांविषयी माहिती देऊन त्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याची सवय लावणे हा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तालुका हिवताप पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर आणि तालुका आरोग्य सहाय्यक विजय देशमुख यांनी उपस्थित नागरिक व रुग्णांना डेंग्यू आजाराविषयी सविस्तर समुपदेशन केले.
डेंग्यू हा एडीस डासांमुळे होणारा आजार असून सकाळी व संध्याकाळी चावणाऱ्या या डासांपासून बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू न देणे, वापरातील पाण्याची भांडी झाकून ठेवणे, संध्याकाळी दारे-खिडक्या लवकर बंद करणे, मच्छरदाणीचा वापर करणे, गुडनाईट लिक्विड व मच्छर अगरबत्तीचा वापर करणे तसेच दारे-खिडक्यांना जाळी बसविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच परिसरात पाणी साचल्यास त्या ठिकाणी डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे सोडणे, गटारीत पाणी तुंबल्यास वंगण ऑईल टाकणे अशा विविध उपाययोजना राबविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. मलेरिया हा अनोफिलीस डासांमुळे होतो. तापासोबत थंडी व घाम येणे ही त्याची प्रमुख लक्षणे असून वेळेवर उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली. नागरिकांना दर आठवड्याला घराभोवती पाणी साचलेली ठिकाणे तपासण्याचे तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. शेवटी उपस्थित नागरिकांनी “माझे गाव – आरोग्य संपन्न गाव” ही शपथ घेत आपल्या कुटुंबीयांमध्येही डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधाचे संदेश पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी आरोग्य पथकाकडून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. तसेच नागरिकांना कोणत्याही आरोग्यविषयक सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे, कंटेनर तपासणी करून घेण्याचे आणि आठवड्यातून एक दिवस “कोरडा दिवस” पाळण्याचे आवाहन करण्यात आले. प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला, डॉ. सिद्धार्थ साळुंखे, औषध निर्माण अधिकारी अजय जैस्वाल, नदीम शेख फरीद, आरोग्य सेवक रामलू मडावी, अशोक वारे, आरोग्य सेविका बिनासिस्टर तसेच सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका आणि मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

No comments