अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल-भुसा...
अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटात शनिवारी (दि. ३०) झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखन अशोक जोहरी (वय ३२, रा. यावल) हे दुचाकी क्रमांक MH-19-DU-6521 ने भुसावळकडून यावलकडे येत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या वहिनी अनिता संदीपसिंग जोहरी (वय ५०) या देखील प्रवास करत होत्या.
दरम्यान, यावलहून भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर क्रमांक MH-19-CY-6651 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, लखन जोहरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिता जोहरी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या अपघातामुळे अंजाळे घाट परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. नागरिकांनी भरधाव वाहने आणि बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

No comments