शेळावे खुर्द गावात वारंवार वीज खंडित; नागरिक संतप्त पारोळा तालुका प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द गा...
शेळावे खुर्द गावात वारंवार वीज खंडित; नागरिक संतप्त
पारोळा तालुका प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द गावात मागील दोन महिन्यांपासून वारंवार होत असलेल्या वीज खंडित प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात स्वतंत्र सबस्टेशन उपलब्ध असतानाही रात्रीच्या वेळी अर्धा तास ते एक तास वीज पुरवठा बंद राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सततच्या वीज खंडित समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी पारधी क्रांती संघटना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष , भीम आर्मी पारोळा तालुका उपाध्यक्ष प्रविण पारधी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध व्यक्त केला. “गावात स्वतंत्र सबस्टेशन असूनही नागरिकांना अंधारात राहावे लागत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. आम्ही वेळेवर वीज बिल भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधा का मिळत नाहीत?” असा सवाल प्रविण पारधी यांनी उपस्थित केला. तसेच, समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास लोकहितासाठी तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

No comments