लोहारा एक्सप्रेस फिडरचा वीजपुरवठा सुरळीत करा; फैजपूर नगरसेवकांची कार्यकारी अभियंत्याकडे मागणी इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकव...
लोहारा एक्सप्रेस फिडरचा वीजपुरवठा सुरळीत करा; फैजपूर नगरसेवकांची कार्यकारी अभियंत्याकडे मागणी
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या लोहारा एक्सप्रेस फिडरवरील सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत आज भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी विविध समस्यांकडे लक्ष वेधत अधिकृत निवेदनही सादर करण्यात आले.
फैजपूर नगरपरिषदेचा पाणीपुरवठा लोहारा (ता. रावेर) येथील जॅकवेलवरून होत असून, त्यासाठी गौरखेडा वीज उपकेंद्रातून एक्सप्रेस फिडर लाईन देण्यात आलेली आहे. मात्र, ही लाईन एक्सप्रेस फिडर असूनही दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होत आहे.
नगरसेवकांनी मांडलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जातो. काही वेळा सूचना दिली तरी ती फक्त दोन तासांची असते, मात्र प्रत्यक्षात अधिक वेळ वीजपुरवठा बंद राहतो. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
तसेच फैजपूर येथील फिल्टर प्लांटवरही एक्सप्रेस फिडर असूनही वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याची बाब नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिली. याशिवाय, गौरखेडा उपकेंद्रातून जाणाऱ्या या फिडरवर मोठ्या प्रमाणात अवैध वीजजोडण्या झाल्याचा आरोप करण्यात आला असून, त्या तात्काळ काढून टाकाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
या सर्व बाबींची दखल घेत कार्यकारी अभियंता, सावदा येथील श्री. महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी भाजपा गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे, उपनगराध्यक्ष निकिता कोळी, उपगटनेते सुरज गाजरे, नगरसेवक विनोद (पप्पू) चौधरी, महेंद्र मंडवाले, सागर होले, राहुल गुजराथी, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, संदीप भारंबे (गोटू भाऊ), नरेंद्र चौधरी, जितेंद्र भारंबे, राजेश महाजन, अनंत नेहेते यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान, शहराच्या पाणीपुरवठ्याशी निगडित हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

No comments