नीट पेपरफुटी प्रकरणावर अखेर आमदार अमित देशमुख यांची प्रतिक्रिया “लातूर पॅटर्न अभेद्यच राहील; दोषींवर कठोर कारवाई व्हावी” लातूर, जि. प्र. (...
नीट पेपरफुटी प्रकरणावर अखेर आमदार अमित देशमुख यांची प्रतिक्रिया
“लातूर पॅटर्न अभेद्यच राहील; दोषींवर कठोर कारवाई व्हावी”
लातूर, जि. प्र. (उत्तम माने) —
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावर अखेर आमदार Amit Deshmukh यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी टिप्पणी करावी असे अजिबात वाटत नसताना काही जणांनी अनावश्यक वक्तव्ये आणि संदर्भहीन चर्चा सुरू केल्याने लोकप्रतिनिधी म्हणून बोलणे आवश्यक झाले,” असे त्यांनी म्हटले आहे.
देशभरातील विविध स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरती प्रक्रियांमधील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असताना नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआय व इतर तपास यंत्रणांकडून सुरू असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याने ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, पेपरफुटीमुळे गुणवंत व मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खिलवाड झाला असून हे प्रकार निषेधार्ह आहेत. सरकार सध्या ज्या गतीने तपास आणि कारवाई करत आहे त्याचे त्यांनी स्वागत केले. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुळापर्यंत जावे आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने कोणतीही घाईघाईने टिप्पणी करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी काही मंडळींकडून होत असलेल्या राजकीय वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. “भूतकाळातील संदर्भ जोडून चुकीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामागचा हेतू शुद्ध दिसत नाही,” असा आरोप त्यांनी केला.
देशभरात गेल्या काही वर्षांत अनेक परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडल्याचे नमूद करत काँग्रेस पक्षाने हा मुद्दा सातत्याने उपस्थित केल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी देशभरातील विविध परीक्षांमधील पेपरफुटीचा मुद्दा संसदेत उपस्थित करून सरकारला जाब विचारल्याचे त्यांनी नमूद केले.
नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील एका निवृत्त प्राध्यापकासह एका शिकवणी क्लास चालकाला अटक झाल्याचा उल्लेख करत त्यांनी सामाजिक माध्यमांवर काही जणांकडून चुकीचे संदर्भ जोडले जात असल्याचा आरोप केला. “एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला म्हणून संपूर्ण समाज किंवा लातूरचा शैक्षणिक लौकिक बदनाम होऊ शकत नाही,” असेही ते म्हणाले.
“लातूर पॅटर्न” हा विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संस्थाचालकांच्या अथक परिश्रमातून उभा राहिलेला असून तो भविष्यातही अभेद्य राहील, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला. सध्याचे सावट लवकर दूर होऊन “लातूर पॅटर्न” पुन्हा नव्या तेजाने झळकून निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

No comments