कर्तव्यदक्ष पोलिस पाटीलांच्या तत्परतेमुळे तीन डेरेदार निंबाची झाडे आगीपासून बचावली शामसुंदर सोनवणे वि.प्र : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आ...
कर्तव्यदक्ष पोलिस पाटीलांच्या तत्परतेमुळे तीन डेरेदार निंबाची झाडे आगीपासून बचावली
शामसुंदर सोनवणे वि.प्र :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आजच्या धावपळीच्या आणि दुर्लक्षाच्या काळातही समाजहिताची जाणीव ठेवून तत्परतेने कार्य करणारी माणसे समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. अशीच एक घटना हातेड परिसरात घडली असून, पोलिस पाटील श्री. सुनील अमृतराव सोनवणे यांच्या जागरूकतेमुळे आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे तीन डेरेदार निंबाची झाडे आगीपासून वाचली.
याबाबत माहिती अशी की, हातेड येथील दीपक पुंडलिक सूर्यवंशी हे काही कामानिमित्त आपल्या गावावरून चोपडा येथे जात असताना रस्त्यालगत उभी असलेली तीन मोठी निंबाची झाडे आगीच्या विळख्यात सापडलेली त्यांनी पाहिली. काही क्षणांतच ही झाडे पूर्णतः जळून खाक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. निसर्गाची ही अनमोल संपत्ती जळताना पाहून त्यांनी तत्काळ परिस्थितीची माहिती आपल्या गावाचे कर्तव्यदक्ष पोलिस पाटील श्री. सुनील अमृतराव सोनवणे यांना दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत श्री. सोनवणे यांनी कोणताही विलंब न करता अग्निशामक यंत्रणेशी संपर्क साधला. तसेच संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती मदत आणि समन्वय साधत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी पर्यावरणीय हानी टळली आणि तीनही डेरेदार निंबाची झाडे वाचविण्यात यश आले.
पोलिस पाटील म्हणून त्यांनी केवळ आपल्या पदाची जबाबदारी पार पाडली नाही, तर एक जागरूक नागरिक आणि समाजाभिमुख व्यक्ती म्हणूनही आपले कर्तव्य निभावले. संकटसमयी योग्य निर्णय आणि वेळेवर घेतलेली कृती किती महत्त्वाची असते, याचे उत्तम उदाहरण या घटनेतून पाहायला मिळाले.
आज अनेकजण समस्या पाहून दुर्लक्ष करतात, मात्र श्री. सुनील अमृतराव सोनवणे यांनी समाजहित आणि पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेली भूमिका निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. अशा कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील व्यक्तींमुळेच समाज अधिक सुरक्षित, सजग आणि पर्यावरणपूरक बनत असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.
“वेळीच घेतलेला निर्णय, तत्पर कृती आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळेच मोठी हानी टळते आणि माणुसकी जिवंत राहते.”

No comments