शेतकऱ्यांना डिझेलचा झटका, पिकांना विजेचा शॉक; प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील — शेतकरी कृती समितीचा इशारा व...
शेतकऱ्यांना डिझेलचा झटका, पिकांना विजेचा शॉक; प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील — शेतकरी कृती समितीचा इशारा
विश्राम तेले चौगाव
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढल्याने केळीसह इतर पिके करपत असताना, दुसरीकडे वीज वितरण विभागाकडून शेतीसाठी मिळणारा वीजपुरवठा आठ तासांवरून सहा तास करण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरत असल्याचा आरोप शेतकरी कृती समितीने केला आहे. प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीजपुरवठा द्यावा, अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभे राहून शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा समितीने दिला आहे.
समितीच्या निवेदनानुसार, आधीच वाढत्या उष्णतेमुळे केळी बागा जळत असून अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यातच आगामी वर्ष ‘अल निनो’च्या सावटाखाली असल्याने पाण्याची उपलब्धता मर्यादित राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कापूस लागवडीची तयारी करत असताना वीजपुरवठा कमी करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
“लोड शेडिंग” या नावाखाली शेतीसाठीचा वीजपुरवठा कमी केला जात असला तरी सकाळी चार ते दुपारी बारा किंवा एक वाजेपर्यंत राज्यातील वीज मागणी तुलनेने कमी असते. त्यामुळे रहिवासी किंवा औद्योगिक भागात नियोजन करता येऊ शकते. मात्र त्याऐवजी शेतकऱ्यांनाच सोपा बळी बनवले जात असल्याची टीका समितीने केली आहे.
दरम्यान, डिझेल विक्रीबाबत “ट्रॅक्टर आणल्याशिवाय डिझेल मिळणार नाही” हा निर्णयही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गावातून तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर घेऊन फिरावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर डिझेलचा अपव्यय होत आहे. विशेषतः पॉवर ट्रिलर धारक शेतकऱ्यांची अधिक गैरसोय होत असल्याचे समितीने सांगितले.
यावर उपाय म्हणून ट्रॅक्टर किंवा पॉवर ट्रिलर धारकांना तलाठ्यामार्फत ओळखपत्र अथवा नोंदणी स्वरूपाचा परवाना द्यावा, त्यावर वाहन क्रमांक, मालकाचे नाव आणि दररोज देण्यात येणाऱ्या डिझेलचे प्रमाण नमूद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पेट्रोल पंप चालकांनी दिलेल्या डिझेलची तारीख व प्रमाण नोंदवून शिक्का मारल्यास एका दिवसात पुन्हा डिझेल मिळणार नाही आणि साठेबाजीही रोखता येईल, असा पर्याय समितीने प्रशासनासमोर मांडला आहे.
सध्या केळी बागा उन्हामुळे जळत असून, अवकाळी पाऊस आणि खरीप हंगामाच्या तोंडावर वीज व डिझेल दोन्हींचा तुटवडा निर्माण झाल्यास शेतकरी पूर्णपणे अडचणीत येईल. त्यामुळे प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेऊन तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील, भागवत महाजन, प्रशांत पाटील, अजित पाटील, नारायण पाटील, धनंजय पाटील, मनीष महाजन, ॲड. धर्मेंद्र सोनार, संदीप महाजन, गोपाल महाजन आणि ऋषिकेश धनगर आदींच्या शिष्टमंडळाची उपस्थिती होती.

No comments