स्वाभिमानीची निपाना महावितरण कार्यालयावर धडक रात्रीची सिंगल फेज तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक...
स्वाभिमानीची निपाना महावितरण कार्यालयावर धडक
रात्रीची सिंगल फेज तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : मालेगाव, वडजी, हरणखेड, आळंद, चिचखेड व दहीगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून निपाना महावितरण कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. रात्रीची सिंगल फेज वीजपुरवठा सायंकाळी ६ वाजल्यापासून नियमित सुरू करण्यात यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर आधारित पीक लागवड केली असून पिकांना वेळेवर पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र महावितरणकडून रात्रीची सिंगल फेज लाईन वेळेवर सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. वीजपुरवठा खंडित राहत असल्यामुळे मोटारी बंद पडत आहेत, पिकांना पाणी देता येत नाही तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.
यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली निपाना महावितरण कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “शेतकऱ्यांना वेळेवर वीज द्या, अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल,” असा थेट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी सांगितले की, शेतकरी आधीच नैसर्गिक संकटे, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिरतेमुळे अडचणीत आहे. त्यातच वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महावितरण प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन तातडीने रात्रीची सिंगल फेज सुरळीत करावी, अन्यथा स्वाभिमानीच्या वतीने तीव्र व व्यापक आंदोलन उभारण्यात येईल.
यावेळी वडजी शाखाध्यक्ष पराग बोंडे, वैभव करांडे, नंदकिशोर राणे, ओंकार राणे, हर्षल नारखेडे, राहुल इंगळे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

No comments