जनगणना 2027 अंतर्गत चोपडा शहरातील घरगणना पहिला टप्पा उत्साहात सुरू चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहरात जनगणना 2027 अंत...
जनगणना 2027 अंतर्गत चोपडा शहरातील घरगणना पहिला टप्पा उत्साहात सुरू
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरात जनगणना 2027 अंतर्गत घरगणनेचा पहिला टप्पा मोठ्या उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, दिनांक 25 मे 2026 पर्यंत सुमारे 40 टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र चोपडा शहरातील सर्व 127 प्रगणकांनी अत्यंत मेहनत, समन्वय व जिद्दीच्या जोरावर 45 ते 50 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. सध्या तीव्र उष्णतेची लाट सुरू असतानाही प्रगणक व पर्यवेक्षक हे सकाळपासून सायंकाळपर्यंत नागरिकांच्या दारी जाऊन माहिती संकलनाचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. अनेक भागांमध्ये तापमान अधिक असतानाही कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत माहिती अचूकपणे नोंदविण्याचे काम सुरू ठेवले आहे. यासंदर्भात चोपडा शहर जनगणना 2027 चे चार्ज अधिकारी श्री रामनिवास झंवर यांनी सर्व पर्यवेक्षकांसोबत आढावा बैठक घेतली. बैठकीदरम्यान विविध प्रगणक व पर्यवेक्षकांनी आपल्या क्षेत्रातील अनुभव मांडले. काही पर्यवेक्षकांनी नागरिकांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. अनेक नागरिकांनी जनगणनेचे महत्त्व समजून घेत सहकार्य केले असून, काही ठिकाणी प्रगणकांना पिण्याचे थंड पाणी व थंड पेय घेण्याबाबत विचारपूस करून आपुलकीची भावना व्यक्त केली असल्याचे अनुभव प्रगणकांनी बैठकीत सांगितले.
एका प्रगणकाने सांगितले की, “प्रखर उन्हातही नागरिक घरातील माहिती संयमाने देत आहेत. अनेक जण जनगणना का महत्त्वाची आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आमच्यातही अधिक उत्साह निर्माण होत आहे.” दुसऱ्या एका पर्यवेक्षकांनी नमूद केले की, “काही नागरिक स्वतः पुढाकार घेऊन शेजारील कुटुंबांनाही माहिती देण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले आहे.” चार्ज अधिकारी श्री रामनिवास झंवर यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, “चोपडा शहरातील एकही इमारत, घर किंवा कुटुंब जनगणनेतून सुटता कामा नये. प्रत्येक नोंद अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात शासन नागरिकांसाठी कोणत्या योजना राबवेल, निधीचे नियोजन कसे होईल, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, निवास व्यवस्था आदी सर्व प्रकारचे नियोजन हे जनगणनेतील आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे ही केवळ माहिती संकलन प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “चोपडा शहरातील सर्व प्रगणक व पर्यवेक्षक अत्यंत उत्साहाने, एकजुटीने व जबाबदारीने काम करत आहेत. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करत प्रत्येक भागात माहिती संकलनाचे कार्य वेगाने सुरू आहे. येत्या 2 जून 2026 पर्यंत शहरातील घरगणना पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.” बैठकीत सर्व पर्यवेक्षकांना आपल्या क्षेत्रातील उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच माहिती संकलन करताना अचूकता, शिस्त व नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.चोपडा शहरातील नागरिकांनी जनगणना कार्यास सहकार्य करून माहिती अचूकपणे द्यावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

No comments