त्रंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या तोरंगण ता. त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) त...
त्रंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या
तोरंगण ता. त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावात सध्या पिण्याच्या पाण्याची अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली असून ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गावातील पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या विहिरीमध्ये विषारी साप मृत अवस्थेत आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मे महिन्याच्या तीव्र उष्णतेमध्ये गेल्या १८ ते २० दिवसांपासून गावातील पाईपलाईनद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. “जल जीवन मिशन” अंतर्गत नवीन पाईपलाईनचे काम सुरू असल्याचे कारण देत ग्रामस्थांना थांबण्यास सांगितले जात आहे. मात्र, अनेक वर्षांपासून व्यवस्थित सुरू असलेली जुनी पाईपलाईन का तोडण्यात आली, याबाबत ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. तसेच ही पाईपलाईन तोडण्यास परवानगी कोणी दिली, याबाबतही प्रशासन मौन बाळगत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नवीन पाईपलाईनचे काम सुरू असले तरी तोपर्यंत पर्यायी पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. गावातील विहिरीमध्ये दररोज दोन ते तीन टँकरद्वारे पाणी टाकून ग्रामस्थांची तहान भागवता आली असती, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून महिलांसह नागरिकांचे हाल होत आहेत.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी काही स्थानिक पुढाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, त्यांनीही या समस्येकडे गांभीर्याने न पाहता केवळ टाळाटाळ करणारी उत्तरे दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावकऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दूषित पाण्याची समस्या दूर करावी तसेच नियमित व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

No comments