देवणी तहसील कार्यालय परिसरातील काळी माती चोरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? “अज्ञात चोर” की संगनमताचा मोठा खेळ? दंड टाळण्यासाठी खोटा गुन्हा दाख...
देवणी तहसील कार्यालय परिसरातील काळी माती चोरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
“अज्ञात चोर” की संगनमताचा मोठा खेळ?
दंड टाळण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केल्याची चर्चा; संबंधित अधिकाऱ्यांच्या CDR तपासणीची मागणी
देवणी प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
देवणी तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त करण्यात आलेली जेसीबी मशीन रहस्यमयरीत्या गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी महसूल प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून संगनमताने प्रयत्न सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, तहसील परिसरातून काळ्या मातीची चोरी दोन ते तीन दिवस खुलेआम सुरू होती. जेसीबीच्या सहाय्याने माती काढून हायवा वाहनांमध्ये भरली जात होती. एवढा मोठा प्रकार शासकीय कार्यालय परिसरात सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय हे शक्यच नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
देवणी तहसील कार्यालयाच्या परिसरातील शासकीय गोडाऊनच्या पाठीमागे साठवून ठेवलेल्या काळ्या मातीची अवैध विक्री व विनापरवाना वाहतूक सुरू असल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर निलंगा उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत दि. ११ एप्रिल २०२६ रोजी दोन हायवा व एक जेसीबी पोकलेनद्वारे शासकीय मातीची चोरी होत असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत एकूण ११ लाख ६२ हजार १२ रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे पंचनामा करताना जेसीबी पोकलेनचा नंबर, इंजिन नंबर, चालकाचे नाव व मालकाचे नाव मुद्दाम टाळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पंचनाम्यावेळी बोगस महसूल चलन दाखविण्यात आल्याचाही आरोप होत आहे. संबंधित चलनाच्या आधारे जेसीबी मालक सहज शोधता येऊ शकतो, मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक कोणतीही ठोस कारवाई न केल्याने मोठ्या आर्थिक व्यवहारांचा संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय रॉयल्टीच्या कोऱ्या पावत्या, पावती पुस्तक क्रमांक २८ मधील अनुक्रमांक १३७१, १३७९, १३८४, १३८७ तसेच आदेश क्रमांक ५०६ हे अत्यंत संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. महसूल विभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संगनमताने संबंधितांना वाचविण्यासाठी पुरावे लपविल्याचा आरोपही होत आहे.
तहसील परिसरात दोन ते तीन दिवस जेसीबीच्या सहाय्याने माती काढून हायवा वाहनांमध्ये भरली जात होती. मग ही माती कोणी उचलली? हायवा कोणी लावले? जेसीबी कोणी आणली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासकीय मातीची चोरी होऊच शकत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
विशेष म्हणजे, गोडाऊन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप फुटेज जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पुरावे नष्ट करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय अधिक बळावत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जप्त करण्यात आलेली जेसीबी मशीनच तहसील कार्यालयाच्या आवारातून गायब करण्यात आली. घटना घडून दीड महिना उलटूनही ना जेसीबीचा शोध लागला, ना ७ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उलट प्रकरण दाबण्यासाठी अज्ञात चोराविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून मूळ आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
या संपूर्ण प्रकरणातील सत्य बाहेर यावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), कॉल रेकॉर्डिंग तसेच संपर्कातील व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. “झिरो ड्रायव्हर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल जप्त करून तपास करण्यात यावा, अशीही मागणी पुढे येत आहे. या तपासातून संपूर्ण माती चोरी रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देवणी तहसील परिसरातून झालेल्या शासकीय माती चोरी प्रकरणात संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, जेसीबी मालक व माती वाहतूक करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची राज्यस्तरीय त्रिसदस्यीय समितीमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने दि. ८ जून २०२६ पासून आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिली आहे.
No comments