उमवि परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार: परीक्षा देऊनही TYBCA चे विद्यार्थी निकालात 'गैरहजर'! अन्यथा 'मनविसे' स्टाईलने आंदोलन छेड...
उमवि परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार: परीक्षा देऊनही TYBCA चे विद्यार्थी निकालात 'गैरहजर'!
अन्यथा 'मनविसे' स्टाईलने आंदोलन छेडणार; मनविसेचा परीक्षा संचालकांना थेट इशारा
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव: कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, परीक्षा देऊनही विद्यार्थ्यांना निकालात चक्क 'गैरहजर' (Absent) दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) याविरोधात आक्रमक पाऊल उचलले आहे. मनविसेच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक मा. श्री. योगेश पाटील यांना आज जळगाव येथे एक प्रसिद्धी पत्रक व निवेदन देऊन तातडीने सुधारित निकाल जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
नेमके काय आहे प्रकरण?
चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले TYBCA चे विद्यार्थी एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षेला नियमानुसार उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी **'BCA 603: Android Application Development'** या विषयाचा पेपर प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून दिला होता. मात्र, विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या निकालामध्ये या सर्व विद्यार्थ्यांना सदर विषयात चक्क 'गैरहजर' (Absent) दाखवण्यात आले आहे. परीक्षा देऊनही निकालपत्रावर 'Absent' आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती, नैराश्य व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनविसेच्या प्रमुख मागण्या:
१. संबंधित परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांची उपस्थिती पत्रके (Attendance Sheets) तात्काळ तपासून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.
२. ज्या दोषी घटकांमुळे किंवा तांत्रिक चुकीमुळे हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला आहे, शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी.
३. सर्व बाधित व पात्र विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल (Updated Result) अत्यंत तातडीने (युध्दपातळीवर) जाहीर करण्यात यावा.
"विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन पेपर दिला आहे, याचे पुरावे उपस्थिती पत्रकावर उपलब्ध आहेत. असे असतानाही विद्यापीठाने त्यांना गैरहजर दाखवणे हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चाललेला खेळ आहे. जर परीक्षा विभागाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर मनविसे आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडेल आणि याची सर्व जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची असेल."हे निवेदन देताना जळगाव मनविसे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, चोपडा मनविसे तालुका संघटक चेतन पवार, विद्यार्थिनी वर्षा घाडगे, लीना चौधरी, प्रिया धनगर, चैताली खोंडे यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि बाधित विद्यार्थी उपस्थित होते.

No comments