adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली परिसरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

 अंतुर्ली परिसरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल  किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 अंतुर्ली परिसरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल 


किरण धायले मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

– जळगाव जिल्ह्यात शनिवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कुऱ्हा परिसरासह रावेर तालुक्यातील विविध शिवारांमध्ये केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापणीस आलेली केळीची पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली, तर काढणीसाठी तयार असलेल्या घडांचे मोठे नुकसान झाले. आधीच विविध नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी अडचणीत असताना या नव्या संकटाने त्यांचे कंबरडे मोडले आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाचा सामना करत शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून केळी पीक जपले होते. मात्र ऐन कापणीच्या टप्प्यावर आलेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या व्हीजेएनटी विभागाचे सचिव अनिल वाडीले यांनी शासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे. केळी पीक विम्याची १०० टक्के भरपाई देण्यात यावी, तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना सरसकट प्रतिएकर किमान १ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासोबतच सानुग्रह अनुदान म्हणून तात्काळ ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी आणि वीजबिलही माफ करावे, अशी मागणीही अनिल वाडीले यांनी केली आहे.

नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शासनाने मदतीची प्रक्रिया गतीने राबवावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

No comments