लासुर येथेपुरुषोत्तम मासात जावयाकडून साल्यांना गोदान; गावात आगळावेगळा आदर्श गोदान करताना-डॉ. अरुण देसले, डॉ. अमित देसले, गोदान स्वीकारताना ह...
लासुर येथेपुरुषोत्तम मासात जावयाकडून साल्यांना गोदान; गावात आगळावेगळा आदर्श
गोदान करताना-डॉ. अरुण देसले, डॉ. अमित देसले, गोदान स्वीकारताना ह भ प प्रभाकर महाजन, ह भ प आत्माराम पाटील.
गलंगी प्रतिनिधी : मच्छिंद्र कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
“वाणाऐवजी गोदान” डॉ. देसले परिवाराचा संस्कार, गोरक्षण आणि सेवाभावाचा अनोखा संदेश
पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मास हा हिंदू धर्मात दान, धर्म, जप, सेवा आणि पुण्यसंचयासाठी विशेष मानला जातो. या पवित्र महिन्यात विविध प्रकारचे दान करण्याची परंपरा आहे. याच भावनेतून आपल्या गावातील जावईबापू आदरणीय डॉ. अरुण देसले व डॉ. अमित देसले यांनी एक आगळावेगळा आणि समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम राबवत गोदान करून गावात वेगळी परंपरा निर्माण केली आहे.
परंपरेनुसार अधिक मासात जावयाला वाण लावण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते; मात्र डॉ. देसले परिवाराने या रूढ चौकटीच्या पुढे जात, नात्याने शालक असलेल्या कुटुंबीयांप्रती स्नेह व्यक्त करत दोन गाई व त्यांच्या वासरांसह पवित्र गोदान केले. हे दान वारकरी परंपरेतील हरिभक्त परायण हभप प्रभाकर महादू महाजन आणि ह भ पआत्माराम पाटील यांना करण्यात आले.
हिंदू संस्कृतीत गोदान अत्यंत पवित्र आणि पुण्यकारक दान मानले जाते
. गाय ही केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती आणि दुग्धव्यवसायाचा महत्त्वाचा आधार आहे. गाईंचे पालन–पोषण, त्यांचे संरक्षण आणि त्यांच्या माध्यमातून स्वावलंबन वाढविण्याचा विचार या दानामागे अधोरेखित होताना दिसतो.
दान करताना एक महत्त्वाचा विश्वासही व्यक्त करण्यात आला- गाईंची योग्य देखभाल केली जाईल, त्यांचे संगोपन केले जाईल आणि त्यांना कसायाकडे विकले जाणार नाही. या भावनेतून हे दान केवळ धार्मिक विधी न राहता गोरक्षण व गोपालनाचा सामाजिक संकल्प ठरला आहे.
विशेष म्हणजे, जावयाने -साल्यांना गोदान
केल्याची घटना गावात चर्चेचा विषय ठरली असून या कृतीकडे नातेसंबंधातील जिव्हाळा, संस्कार आणि समाजहिताचा सुंदर संगम म्हणून पाहिले जात आहे. डॉ. देसले परिवाराच्या या उपक्रमाचे गावभर कौतुक होत असून पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने त्यांनी दिलेला हा संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे
“दान हे केवळ देण्यात नसते, तर त्यामागील भावनेत असते”
या विचाराला साजेशी ही गोदानाची प्रेरणादायी परंपरा गावासाठी निश्चितच स्मरणीय ठरणार आहे.

No comments