उदगीर-अहमदपूर मार्गावर एसटी बस पलटी; प्रवाशांची थरारक सुटका, अरुंद रस्त्यामुळे ताबा सुटला अन् काय घडलं! अरुंद पर्यायी रस्त्यावर समोरून येणा...
उदगीर-अहमदपूर मार्गावर एसटी बस पलटी; प्रवाशांची थरारक सुटका, अरुंद रस्त्यामुळे ताबा सुटला अन् काय घडलं!
अरुंद पर्यायी रस्त्यावर समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना चालकाचा ताबा सुटला; बस पलटी होऊन प्रवासी अडकले, ग्रामस्थांच्या वेगवान मदतकार्यामुळे सर्वांची थरारक सुटका.
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
उदगीर : उदगीर-अहमदपूर मार्गावरील सुकणी गावाजवळ आज दुपारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून गंभीर जखमींना उपचारासाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-20 बीएल-2018 क्रमांकाची एसटी बस दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास उदगीरहून अहमदपूरकडे जात होती. सुकणी गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा रस्ता अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सुकणी गावातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावून आले. बस पलटी झाल्यामुळे अनेक प्रवासी आत अडकून पडले होते. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत चालकाच्या खिडकीतून बसमध्ये प्रवेश केला आणि एकामागून एक सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
अपघातात काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने उदगीरच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे नेमके कारण व जखमींची संख्या याबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी असून पुढील तपास सुरू आहे.

No comments