मोरखेड ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर – गावातील अ...
मोरखेड ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर – गावातील अंडरग्राउंड नालीवरील चेंबर मागील चार महिन्यांपासून ब्लॉक झाल्यामुळे घाण सांडपाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोरखेड बु. येथे सुमारे दोन वर्षांपूर्वी सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी अंडरग्राउंड नालीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, मागील चार महिन्यांपासून नालीवरील चेंबर ब्लॉक झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना अडथळा निर्माण होत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.याबाबत ग्रामपंचायत सदस्य आधारसिंग राजपूत यांनी चार महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली होती.
तथापि, सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.गावातील नागरिकांना सार्वजनिक हौदावर गुरांना पाणी पाजण्यासाठी तसेच महिलांना धोबीघाटावर जाण्यासाठी घाण सांडपाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याची चिंता अधिक वाढली आहे.ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.येत्या आठ दिवसांत नालीवरील चेंबरची दुरुस्ती करून सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे."नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी," अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

No comments