adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

केळी बागायतदारांना हक्काची नुकसानभरपाई कधी?; आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदत द्या – काँग्रेसची मागणी

केळी बागायतदारांना हक्काची नुकसानभरपाई कधी?; आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदत द्या – काँग्रेसची मागणी  किरण धायले अंतुर्ली (संपादक -:- हेमकांत ...

केळी बागायतदारांना हक्काची नुकसानभरपाई कधी?; आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदत द्या – काँग्रेसची मागणी 


किरण धायले अंतुर्ली

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जळगाव जिल्ह्यासह परिसरातील हजारो एकरांवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुक्ताईनगर तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारकडे तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना केवळ आश्वासने, पाहणी दौरे, व्हिडिओ कॉन्फरन्स आणि फोटोसेशन नको असून प्रत्यक्ष आर्थिक मदत हवी आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री, आमदार, केंद्रीय मंत्री, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी यांनी भेटी दिल्या. अनेकांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि शासन दरबारी मांडल्याही. आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकसानग्रस्त केळी बागांची स्थिती दाखवून दिली होती. तरीदेखील शेतकऱ्यांना अद्याप ठोस मदत मिळालेली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली.

जिल्हाधिकारी, जळगाव यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी महसूल व कृषी विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पीक विमा कंपन्यांनीही नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात राज्य व केंद्र सरकारमधील मंत्री प्रतिनिधित्व करत असतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्तांना योग्य मदत देण्याच्या सूचना केल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात विमा कंपन्यांकडून अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारींमध्ये क्षेत्र कमी दाखविणे, अर्ज नामंजूर करणे अशा प्रकारच्या तक्रारी समोर येत आहेत. यापूर्वीही विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अनेक वेळा करण्यात आले; मात्र त्यानुसार नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा शासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. "शेतकऱ्यांना आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. पीक विमा व नुकसानभरपाईची रक्कम विनाअट, विनाशर्त आणि सरसकट १०० टक्के प्रमाणात तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी," अशी मागणी काँग्रेसच्या मुक्ताईनगर तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

No comments