'स्वस्तात सोने' घेण्याच्या नादात झाली ५२ लाखांची लूट..LCB ची थरारक कारवाई,नांदेडमधून ५ अट्टल दरोडेखोर जेरबंद! सचिन मोकळं अहिल्यान...
'स्वस्तात सोने' घेण्याच्या नादात झाली ५२ लाखांची लूट..LCB ची थरारक कारवाई,नांदेडमधून ५ अट्टल दरोडेखोर जेरबंद!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-"स्वस्तात सोने देतो" असं आमिष दाखवून ५२ लाख ८० हजारांना लुटणाऱ्या एका अट्टल टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने पर्दाफाश केला आहे.अत्यंत शिताफीने सापळा रचून पोलिसांनी ५ आरोपींना नांदेडमधून बेड्या ठोकल्या असून,त्यांच्याकडून तब्बल २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यातील सणसवाडी (ता.माणगाव) येथील रहिवासी असलेले फिर्यादी अविनाश अनिल नलावडे यांच्याकडे राजू मोहिते आणि अक्षय मोहिते यांनी आधी काम करून त्यांचा विश्वास संपादन केला.त्यानंतर फिर्यादीला "स्वस्तात सोने देतो" असे लालच दाखवले.४ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या साक्षीदारांना अहिल्यानगर मधील बुरुगाव शिवारात,रेल्वे उड्डाणपुलाजवळ बोलावून घेतले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी फिर्यादीला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ५२,८०,००० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला.याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१०(२) आणि ३१८(४) नुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.त्यानुसार सपोनि.हरीश भोये,पोउपनि. अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार शाहिद शेख,गणेश धोत्रे,सुनिल पवार,फुरकान शेख,आकाश काळे,अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर,रोहित येमुल,चालक चंद्रकांत कुसळकर यांनी तपासाची चक्रे फिरवली.गुप्त बातमीदार आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली की,हे आरोपी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील 'झेंडीगुळा लोणी' गावात लपले आहेत.पोलिसांनी वेळ न गमावता तिथे छापा टाकून ५ आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शिवाजी उर्फ शिवा विठ्ठल मोहिते (वय ५२, रा. झेंडीगुळा लोणी, ता. किनवट, जि. नांदेड),राजू उर्फ चंदू रामदास मोहिते (वय ३६, रा. झेंडीगुळा लोणी,ता. किनवट, जि. नांदेड),अक्षय उर्फ आकाश रामदास मोहिते (वय २७, रा. माळठा, ता. हदगाव, जि. नांदेड),छगन दशरथ मोहिते (वय ३६, रा. याडी, ता. नेर, जि. यवतमाळ),दिनेश सुदाम जाधव (वय २४, रा. दगडवाडी, ता. हदगाव, जि. नांदेड) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) ने यशस्वीरित्या पार पाडली.

No comments