लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई : सहकार अधिकारी व दोन लेखापरीक्षक ३० हजारांची लाच घेताना जाळ्यात जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई : सहकार अधिकारी व दोन लेखापरीक्षक ३० हजारांची लाच घेताना जाळ्यात
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव, (दि.१५)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) जळगाव यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, भुसावळ येथील एका सहकार अधिकाऱ्यासह दोन प्रमाणित लेखापरीक्षकांविरुद्ध यशस्वी सापळा कारवाई करून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
प्राप्त माहितीनुसार, भुसावळ येथील एका रहिवाशाने सावकारी व्यवसायासाठी परवाना काढण्यासाठी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, भुसावळ येथे अर्ज दाखल केला होता. संबंधित परवाना मंजूर करून देण्यासाठी सहकार अधिकारी विजय विनायक राऊत (वर्ग-३) यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश जनार्दन विसपुते व हेमंत प्रकाश काळे यांनीही स्वतःसाठी आणि सहकार अधिकाऱ्याच्या वतीने एकूण ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाचेच्या मागणीची पुष्टी झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. १५ जून २०२६ रोजी भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात आरोपी सुरेश विसपुते यांनी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यातील ३ हजार रुपये विजय राऊत यांच्यासाठी असल्याचे तपासात समोर आले.
या कारवाईत सहकार अधिकारी विजय विनायक राऊत, प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश जनार्दन विसपुते आणि प्रमाणित लेखापरीक्षक हेमंत प्रकाश काळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७, ७अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बाजारपेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक रेश्मा अवताडे, पोलीस अंमलदार व इतर अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. भ्रष्टाचाराविरुद्ध नागरिकांच्या सहकार्यामुळे अशा कारवायांना बळ मिळत असल्याचे विभागाने म्हटले आहे.

No comments