गारपिटीने केळीबागा उद्ध्वस्त; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख मदत व ५० हजार सानुग्रह अनुदान द्या – काँग्रेसची मागणी किरण धायले मुक्ताईनगर ...
गारपिटीने केळीबागा उद्ध्वस्त; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख मदत व ५० हजार सानुग्रह अनुदान द्या – काँग्रेसची मागणी
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : जिल्ह्यात शनिवारी (दि. ६ जून २०२६) दुपारी दोन ते अडीच वाजेदरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कुऱ्हा परिसरासह रावेर तालुक्यातील अनेक शेतशिवारांमध्ये केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीसाठी तयार असलेल्या केळीबागा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
उन्हाळ्यात ४५ अंशांपेक्षा अधिक तापमानात लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी केळी पिके जपली होती. मात्र अवकाळी गारपीट व वादळी वाऱ्याने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच विविध संकटांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असताना या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याच्यासमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त केळी बागायतदारांना पीक विम्याची १०० टक्के भरपाई देण्यात यावी, तसेच राज्य शासनाने कोणतीही अट किंवा शर्त न लावता संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकर किमान एक लाख रुपयांची मदत तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, पुढील हंगामासाठी शेती तयार करण्यासाठी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी तसेच वीजबिल माफ करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांना निवेदन देण्यात आले असून ही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या VJNT विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले, किरण धायले व शे. भैय्या शे. करीम यांनी केली आहे.

No comments