स्थानिक गुन्हे शाखेचा थरारक 'डबल धमाका'! नाशिकच्या दोन अट्टल गुन्हेगारांना फिल्मी स्टाईलने घेतले ताब्यात.. गावठी कट्टे अन् स्कॉर्पि...
स्थानिक गुन्हे शाखेचा थरारक 'डबल धमाका'! नाशिकच्या दोन अट्टल गुन्हेगारांना फिल्मी स्टाईलने घेतले ताब्यात.. गावठी कट्टे अन् स्कॉर्पिओ जप्त!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी उघडलेल्या धडक मोहिमेला मोठे यश आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने २४ तासांत नेवासा आणि श्रीरामपूर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी फिल्मी स्टाईलने सापळा रचून नाशिकच्या दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांच्या हाती २ गावठी कट्टे (पिस्टल), ४ जिवंत काडतुसे आणि एक आलिशान स्कॉर्पिओ गाडीसह एकूण १५ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल लागला आहे.
कारवाई नंबर १: नेवासा हायवेवर जिओ पेट्रोल पंपाजवळ थरार! (१५ गुन्हे दाखल असलेला आरोपी जेरबंद) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना,त्यांना गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, नाशिकचा एक रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रोडवरील हांडीनिमगाव शिवारात कट्टा घेऊन फिरत आहे.पोलिसांनी तत्काळ जिओ पेट्रोल पंपाजवळ मोकळ्या मैदानात संशयास्पदरित्या उभे असलेल्या इसमावर झडप घातली.श्रावण सुरेश पिंपळे (वय २८,रा.नैताळे,ता. निफाड,जि.नाशिक) यास ताब्यात घेतले.या आरोपीवर यापूर्वी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात तब्बल १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपीच्या ताब्यातून ३० हजार रुपयांचे १ गावठी पिस्टल,२ हजार रुपयांची २ जिवंत काडतुसे आणि १० हजारांचा मोबाईल (एकूण किंमत ४२,००० रुपये) किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कारवाई नंबर २:- पहिली कारवाई सुरू असतानाच,एलसीबीच्या पथकाला श्रीरामपूर शहर हद्दीत दुसरी मोठी टीप मिळाली.हरेगाव फाटा शिवारात एका काळ्या रंगाच्या, विना नंबरच्या स्कॉर्पिओ गाडीतून एक तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत होता.पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाच्या पुढे 'एस कॉर्नर' रोडजवळ दबा धरून सापळा रचला.हरेगावकडून श्रीरामपूरकडे येणारी संशयास्पद स्कॉर्पिओ दिसताच पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला आणि गाडीची नाकेबंदी करून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.त्याने त्याचे नाव अविनाश धनराज माकोने (वय २७,रा. निफाड,जि.नाशिक) असे सांगितले.या आरोपीवरही नाशिक व अहिल्यानगरमध्ये ९ गुन्हे दाखल आहेत.याच्या ताब्यातून ३० हजारांचे १ गावठी पिस्टल,२ हजार रुपयांची २ जिवंत काडतुसे, १० हजारांचा मोबाईल आणि १५ लाख रुपयांची काळी स्कॉर्पिओ गाडी असा एकूण १५ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,सपोनि हरीष भोये,पोउपनि संदीप मुरकुटे,पोलीस अंमलदार विष्णू भागवत,फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे,किशोर शिरसाठ,भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर,बाळासाहेब खेडकर,महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे आणि अरुण मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

No comments