निलेश सोनवणे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान जळगांव प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) माध्यमिक विद्यालय धारशेरी ता.धरणगां...
निलेश सोनवणे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
जळगांव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
माध्यमिक विद्यालय धारशेरी ता.धरणगांव येथील उपक्रमशील व विद्यार्थीकेंद्रित शिक्षणासाठी ओळख असलेले शिक्षक श्री. निलेश साहेबराव सोनवणे यांना राज्यस्तरीय "आदर्श शिक्षक पुरस्कार" प्रदान करून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता पगार यांच्या हस्ते शिर्डी येथे दिमाखदार समारंभात प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती तसेच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल व इतर साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी निलेश सोनवणे यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होत असून शाळेच्या प्रगतीतही मोलाचा वाटा उचलला जात असल्याचे सांगितले.तसेच आपल्या कार्याचा ठसा पूर्ण भारतभर उमटवा असेही सांगण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना निलेश सोनवणे म्हणाले,
"हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्यावर विश्वास ठेवणारे सर्व विद्यार्थी, सहकारी शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन यांचा आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांची ही पावती आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून भविष्यातही अधिक जोमाने आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी कार्य करत राहीन. माझे गुरुवर्य आदरणीय बापूसाहेब श्री.आर.डि.पाटील सर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य व समाजपरिवर्तन घडविण्याचा माझा प्रयत्न कायम राहील."
या गौरवाबद्दल महाराष्ट्रातून निलेश सोनवणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.


No comments