स्वच्छता व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज – संत निलेश महाराज कथेच्या चौथ्या दिवशी आरती करताना प्रा.श्रीसूर्यकांत के चौधरी व सौ. प्रिया सूर्यकां...
स्वच्छता व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज – संत निलेश महाराज
![]() |
| कथेच्या चौथ्या दिवशी आरती करताना प्रा.श्रीसूर्यकांत के चौधरी व सौ. प्रिया सूर्यकांत चौधरी |
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : श्रीराम नगर, चोपडा येथे सुरू असलेल्या गो-भागवत कथेमध्ये चौथ्या दिवशी प्रवचन करताना संत निलेश महाराज यांनी पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी यावर विशेष मार्गदर्शन केले. वाढते तापमान, अवकाळी पाऊस आणि वादळी हवामान यामागे वृक्षतोड हे प्रमुख कारण असल्याचे सांगत त्यांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. महाराज म्हणाले की, दिवसेंदिवस वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस, वादळे आणि इतर नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी स्वच्छतेचे महत्त्वही पटवून दिले. "ज्या घरात स्वच्छता असते, त्या घरात लक्ष्मीचा वास असतो; तर अस्वच्छता आणि उष्टी भांडी असलेल्या घरात दरिद्रता निवास करते," असे सांगत त्यांनी घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे उपस्थित श्रोत्यांची स्वच्छता व पर्यावरणाबाबत चांगलीच जनजागृती झाली.
दरम्यान, के. डी. चौधरी सर यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त गो-भागवत कथेच्या चौथ्या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी हनुमंत महाराज यांच्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले. भजनांच्या तालावर भाविकांनी नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला.
कार्यक्रमात श्री सूर्यकांत के. चौधरी व सौ. प्रिया सूर्यकांत चौधरी, लखन व सौ. चंद्रकला तेली, ज्ञानेश्वर नेरकर, मोरे अप्पा, ज्ञानेश्वर पाटील, श्रीमती वर्षा पाटील, पांडुरंग चौधरी आदींनी आरतीचा लाभ घेतला. अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष टी. एम. चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच त्यांनी संत निलेश महाराज यांचे स्वागत करून त्यांच्या विचारांचे कौतुक केले. कथा श्रवणाचा लाभ अधिकाधिक भाविकांनी घ्यावा, असे आवाहन टी. एम. चौधरी, देवकांत के. चौधरी, लखन तेली व सौ. धनश्री चौधरी यांनी केले. कथास्थळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. संत निलेश महाराज यांच्या प्रेरणादायी संदेशामुळे पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.

No comments