मुरूम टाकून तलाव बुजवला चौकशीत उघड! पोलीस बंदोबस्तात व्हिडिओसह पंचनामा तलाव बुजवणाऱ्यांवर कारवाई होणार का? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्...
मुरूम टाकून तलाव बुजवला चौकशीत उघड! पोलीस बंदोबस्तात व्हिडिओसह पंचनामा
तलाव बुजवणाऱ्यांवर कारवाई होणार का? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष
स्थळ पाहणीने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले! तलाव पूर्ववत होणार का?
निलंगा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
शिऊर ता.निलंगा येथील गाव तलाव बुजवून अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम केल्याच्या गंभीर तक्रारीची अखेर प्रशासनाने दखल घेत शुक्रवारी (दि. 29 मे 2026) त्रीसदस्यीय समितीमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी व चौकशी केली. तक्रारदाराच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हलले असून, झालेल्या पाहणीमुळे अतिक्रमणधारकांची धाकधूक वाढल्याची चर्चा गावात रंगली आहे.
दुपारी 2.30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात त्रीसदस्यीय समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती औसा, शाखा अभियंता जिल्हा परिषद ल.पा.व पा.पु. उपविभाग औसा, तक्रारदार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, पोलीस बंदोबस्त आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत चौकशीला सुरुवात झाली. ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदींची पाहणी केल्यानंतर समितीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तलाव परिसराची तपासणी केली.
शिऊर गावाच्या पश्चिमेस वडार वस्तीच्या दक्षिणेस मोबाईल टॉवरजवळील जागेची पाहणी करताना संबंधित ठिकाणी गाव तलावाचे स्पष्ट स्वरूप प्रथमदर्शनी दिसून आले. तलावात मोठ्या प्रमाणात मुरूम व खडक टाकून भराव करण्यात आल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले व तक्रार देताना सदर खडक व मुरूम ची व्हिडिओ करण्यात आली होती परंतु तक्रारीनंतर काही भागातील मुरूम उकरण्यात आल्याचे निदर्शनास आले. याशिवाय तलावाच्या जागेवर मोठी स्पेस जागा धरून पाच फूट उंचीचे बेसमेंटपर्यंत बांधकाम करून अनेक लोखंडी पिल्लर उभारण्यात आल्याचे आणि पूर्व बाजूस पत्र्याचे शेड उभारण्यात आल्याचे समितीच्या पाहणीत स्पष्ट झाले.
या वेळी सरपंच तथा प्रशासक भानुदास राघोबा सूर्यवंशी यांनी संबंधित ठिकाणी गेली 60 ते 65 वर्षे गाव तलाव अस्तित्वात असल्याची माहिती दिली. ग्रामविकास अधिकारी एस. शिंगे यांनी आपण नुकताच पदभार स्वीकारल्याचे सांगत, तलावासंदर्भात ग्रामपंचायत दप्तरी कोणतीही नोंद नसल्याचे नमूद केले. मात्र जागा गायरान असल्याबाबत महसूल विभागाकडून माहिती घेऊन चार दिवसांत अहवाल सादर करू तसेच अतिक्रमण सिद्ध झाल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 53 नुसार पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
तलावाच्या जागेवर झालेला मुरूम भराव, अतिक्रमण आणि बांधकाम याबाबत महसूल, जलसंधारण, लघु पाटबंधारे, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत यांचे स्वतंत्र रीतसर अहवाल घेऊन तसेच शिऊरचे दाजी यांच्याकडून 15 दिवसांत खुलासा मागविण्याचे निर्देश देण्यात आले.
तक्रारदार यांनी जाहीर केलेल्या 8 जून 2026 च्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.
विशेष म्हणजे संपूर्ण चौकशी व्हिडिओ शूटिंगद्वारे करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बिट आमलदार बालाजी विभुते व पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
स्थळ पाहणीदरम्यान ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून तलाव पूर्ववत करण्याची मागणी लावून धरली. प्रशासनाच्या या हालचालींमुळे तलावावरील अतिक्रमण हटवून टाकण्यात आलेला खडक मुरूम काढला जाईल आणि जुना तलाव पुन्हा अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
No comments