मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून म्हाडा कॉलनीतील नागरिकांचा नगर परिषदेत धडक मोर्चा; प्रशासनाला जाब अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमक...
मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून म्हाडा कॉलनीतील नागरिकांचा नगर परिषदेत धडक मोर्चा; प्रशासनाला जाब
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर नगर परिषद हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरात पाणीपुरवठा, रस्ते, नाल्यांची साफसफाई, स्ट्रीटलाईट यांसारख्या मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने संतप्त नागरिकांनी सोमवार (१५ जून) रोजी नगर परिषद कार्यालयावर धडक देत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
म्हाडा कॉलनी परिसरातील रहिवाशांना नगर परिषद प्रशासनाकडून आवश्यक नागरी सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगण्यात आले. त्यातही मिळणारे पाणी अनेकदा अशुद्ध व जंतुरहित नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
याशिवाय परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने तसेच काही भागांत नाल्यांचीच व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढून विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी अनेक भागांमध्ये स्ट्रीटलाईटची सुविधाही अपुरी असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांनी आरोप केला की, नगर परिषद हद्दीत असूनही म्हाडा कॉलनीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही. त्यामुळे महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने रहिवाशांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारत आपला संताप व्यक्त केला.
यावेळी नागरिकांनी म्हाडा कॉलनी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविणे, नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करणे, नाल्यांची साफसफाई करणे, आवश्यक ठिकाणी नवीन नाल्यांची उभारणी करणे, बंद पडलेल्या स्ट्रीटलाईट सुरू करणे तसेच खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.
याप्रसंगी बलराम बावस्कर, अशोक गाढवे, अनिताताई बाम्हंदे, प्रशांत लहुकार, बेबाबाई डिगंबर, अनिता पाटील, लक्ष्मी भालेराव, रविंद्र बाम्हंदे, लक्ष्मण निंबोळकर, उषा गलांडे, धरमसिंग वावरे, नारायण सातव, वनमाला चंदनशिव, पंजु संबारे, आशाबाई नरवाडे, प्रकाश रोकडे, रूपाली पवार, पुष्पा बोरकर, मनिषा इंगळे, वंदना अवसरमोल, अर्चना वाकोडे, आकाश सावळे, अजय अवसरमोल, अमोल इंगळे, ज्योती तायडे, ईश्वर भगत, शोभाबाई खंडारे, बादलसिंग बाबरे, वैशाली मावळे यांच्यासह म्हाडा कॉलनी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.



No comments