ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. शिवाजीराव शिंदे यांचे दुःखद निधन; समाजवादी चळवळीचा बुलंद आवाज हरपला लातूर, जि. प. (उत्तम माने) (संपादक :- हेम...
ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. शिवाजीराव शिंदे यांचे दुःखद निधन; समाजवादी चळवळीचा बुलंद आवाज हरपला
लातूर, जि. प. (उत्तम माने)
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
विद्यार्थीदशेपासूनच डाव्या व समाजवादी विचारसरणीची कास धरत वंचित, शोषित आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. शिवाजीराव शिंदे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आतड्याच्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. हैदराबाद आणि लातूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीचा एक निस्वार्थी, लढवय्या आणि बुलंद आवाज कायमचा हरपला असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दि. २२ रोजी सकाळी ९ वाजता त्यांचे मूळ गाव अंबुलगा बु. (ता. निलंगा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
स्वातंत्र्यलढ्याच्या विचारांतून घडलेले नेतृत्व
सन १९४६ मध्ये निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु. येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात प्रा. शिवाजीराव शिंदे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भिवाजीराव शिंदे हे स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. महात्मा गांधी यांच्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग नोंदविला होता. वडिलांच्या देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीच्या विचारांतून शिवाजीराव शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व घडले.
विद्यार्थीदशेपासूनच प्रा. ना. य. डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सामाजिक व राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. पुढे बाबा आढाव, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आणि भाई वैद्य यांसारख्या समाजवादी नेत्यांच्या सहवासात त्यांनी जनता दलामध्ये उल्लेखनीय कार्य केले.
महाराष्ट्र पिंजून काढणारे संघटक
जनता दलाचे राज्य सरचिटणीस म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. राज्यात 'पुलोद' सरकारच्या काळात समन्वय समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. चंद्रशेखर यांच्या ऐतिहासिक दिल्ली ते कन्याकुमारी भारत पदयात्रेचे व्यवस्थापन प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या संघटन कौशल्याने प्रभावित होऊन चंद्रशेखर यांनी त्यांना "महाराष्ट्र के छत्रपती" अशी गौरवपूर्ण उपमा दिली होती.
सामाजिक समतेसाठी आयुष्यभर संघर्ष
१९६७ ते १९७० या काळात बाबा आढाव यांच्या 'एक गाव एक पानवठा' चळवळीत सहभागी होत त्यांनी दलित समाजासाठी सार्वजनिक विहिरी खुल्या करण्याच्या अभियानात सक्रिय योगदान दिले. राजस्थानातील आदिवासी भागातही त्यांनी सामाजिक न्यायासाठी लढे उभारले आणि शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले.
राजकारणातील 'किंगमेकर'
१९९५ मध्ये जनता दलाचे लातूर जिल्हाध्यक्ष असताना त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे जिल्ह्यात जनता दलाचा सुवर्णकाळ निर्माण झाला. त्यांनी अनेक सामान्य कार्यकर्त्यांना आमदार-खासदार पदापर्यंत पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली. स्वतःसाठी कोणतेही पद किंवा सत्तेचा मोह न बाळगता त्यांनी कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचे काम आयुष्यभर केले.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी एका जाहीर सभेत त्यांचा "राजकारणातील धुळीत पडलेले रत्न" असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.
वाचन, लेखन आणि सामाजिक बांधिलकी यांचा त्रिवेणी संगम असलेल्या प्रा. शिवाजीराव शिंदे यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांच्या निधनाने लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि पुरोगामी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
त्यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

No comments