खामगाव-जालना रेल्वे मार्गाला गती; भूमी अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित अमोल बावस्कार बुलढाणा/ पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेम...
खामगाव-जालना रेल्वे मार्गाला गती; भूमी अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित
अमोल बावस्कार बुलढाणा/ पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बुलढाणा : जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी असून बहुप्रतिक्षित खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी भूमी (जमीन) अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रकाशित झाली आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला असून प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळणार आहे.
हा १६२ किलोमीटर लांबीचा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग मध्य रेल्वे अंतर्गत विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आला आहे. रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८ अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली असून जालना व खामगाव परिसरातील आवश्यक जमिनीचे संपादन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्य सरकारने प्रकल्पातील ५० टक्के निधीची तरतूद केल्यानंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. अखेर भूमी अधिग्रहणाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यासह मध्य आणि मराठवाडा विभागातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

No comments