रावेर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.. रावेर घरफोडी चार सराईत आरोपी मध्यप्रदेशातून अटकेत.. मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रा...
रावेर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी..
रावेर घरफोडी चार सराईत आरोपी मध्यप्रदेशातून अटकेत..
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर शहरातील रामबाग कॉलनी परिसरात मार्च महिन्यात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा यशस्वी उलगडा करण्यात रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले असून या प्रकरणातील चार सराईत आरोपींना मध्यप्रदेशातील नारायणगड येथून अटक करण्यात आली आहे.
याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी दिलीप पाटील (रा. रामबाग कॉलनी, रावेर) यांच्या घरात १९ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री
अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे गज कापून प्रवेश केला होता. चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ९८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची
सखोल तपासणी केली. मात्र आरोपींनी सीसीटीव्हीच्या नजरेत न येण्यासाठी शहरातील नाल्यांचा मार्ग वापरल्याचे निष्पन्न झाले. तसेच घरातील खिडकीचे गज कमी आवाज करणाऱ्या बॅटरीवर चालणाऱ्या कटर मशीनच्या सहाय्याने कापण्यात आल्याचेही तपासात स्पष्ट झाले. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांची माहिती संकलित केली. तपासादरम्यान मध्यप्रदेशातील धार व अलीराजपूर जिल्ह्यातील एक टोळी अशा प्रकारच्या घरफोड्यांमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून मध्यप्रदेशातील नारायणगड येथे जाऊन चार संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश उर्फ गणपत दितिया (वय २८), कैलाश दितिया (वय ५०, दोघे रा. रंजीतगड, जि. अलीराजपूर), छोटू रेवसिंह (रा. नरबाली, जि. धार) आणि दिनेश लक्ष्मण अनारे (वय २३, रा. भिलवंती, जि. धार) यांचा समावेश
आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत तसेच पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे तसेच गुन्हे शोध पथकातील ईश्वर चव्हाण, समाधान ठाकूर, रवींद्र महाजन, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील व सुकेश तडवी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.

No comments