adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लातूर हादरले! निलंगा तालुक्यात तरुणावर प्राणघातक हल्ला... पाणी मागितल्यावर तोंडावर केली लघुशंका..! आंबुलगा (बु) येथे माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार.. पीडित तरुणाचे जबरदस्तीने केले अर्धवट टक्कल, औराद शहाजानी पोलिसांत गुन्हा दाखल...

  लातूर हादरले! निलंगा तालुक्यात तरुणावर प्राणघातक हल्ला... पाणी मागितल्यावर तोंडावर केली लघुशंका..!  आंबुलगा (बु) येथे माणुसकीला काळीमा फास...

 लातूर हादरले! निलंगा तालुक्यात तरुणावर प्राणघातक हल्ला...

पाणी मागितल्यावर तोंडावर केली लघुशंका..!

 आंबुलगा (बु) येथे माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार..

पीडित तरुणाचे जबरदस्तीने केले अर्धवट टक्कल,

औराद शहाजानी पोलिसांत गुन्हा दाखल...




​लातूर जिल्हा प्रतिनिधी 


(संपादक : हेमकांत गायकवाड)


लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथे एका तरुणावर अत्यंत अमानुष आणि पाशवी पद्धतीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम हल्लेखोरांनी केवळ बेदम मारहाण करूनच समाधान मानले नाही, तर पीडित तरुणाचे बळजबरीने अर्धवट टक्कल केले. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी तरुणाने जीव वाचवण्यासाठी पाणी मागितले असता, हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचा अत्यंत संतापजनक आरोप फिर्यादीने केला आहे. या विकृत आणि अमानुष कृत्यामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांमधून आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी होत आहे.

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल उत्तम माने हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत महिला बचत गटाच्या कार्यालयीन कामानिमित्त अंबुलगा (बु.) गावात गेले होते. यावेळी दोन वर्षांपूर्वी झालेल्या जुन्या भांडणाचा आकस मनात बाळगून टपून बसलेल्या गावातील गुंडांनी त्यांना रस्त्यातच गाठले. अजीत देविदास माने, सचिन देविदास माने, अनिकेत धनाजी माने आणि अमन बालाजी माने यांनी बेकायदेशीर जमाव जमवून राहुल यांना घेरले. कोणतीही शहानिशा न करता आरोपींनी लोखंडी रॉड, लाकडी दांडे, काठ्या आणि पट्ट्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला.

​या भीषण हल्ल्यात राहुल यांच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर व वर्मी जखमा झाल्या. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतरही नराधमांची विकृती थांबली नाही. त्यांनी राहुल यांना जाणीवपूर्वक अपमानित करण्यासाठी त्यांचे बळजबरीने अर्धवट टक्कल केले. असह्य वेदनांमुळे विव्हळत असलेल्या राहुल यांनी पिण्यासाठी पाण्याचा टिपूस मागितला असता, आरोपींनी माणुसकीची सर्व नराधम कृत्य करत थेट त्यांच्या तोंडावर लघुशंका केली. हा अंगावर काटा आणणारा प्रकार फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केला आहे. यासोबतच आरोपींनी त्यांचा मोबाईल आणि इतर साहित्यही जबरीने हिसकावून घेतले.

​या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुल माने यांच्यावर सध्या निलंगा येथील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच संपूर्ण निलंगा तालुक्यात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना समाजात फिरण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांच्यावर मोक्कांतर्गत किंवा अत्यंत कडक कलमांन्वये कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

या घटनेची गांभीर्याने दखल घेत औराद शहाजानी पोलिसांनी नराधम आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेची संवेदनशीलता पाहता पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके रवाना केली असून पुढील तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

No comments