पंचायत समिति तील संबंधित शाखा अभियंताच्या कामांची चौकशीचे जिल्हा परीषदेकडुन आदेश : माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांच्या ...
पंचायत समिति तील संबंधित शाखा अभियंताच्या कामांची चौकशीचे जिल्हा परीषदेकडुन आदेश : माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांच्या तक्रारीची दखल
जळगाव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये पंधरावा वित्त आयोग निधी अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांमधील कथित अनियमिततेबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी केलेल्या तक्रारीची जिल्हा परिषद जळगाव प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
जिल्हा परिषद (ग्राम पंचायत विभाग) यांनी दि. १० जून २०२६ रोजी पंचायत समिती जळगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित शाखा अभियंत्यांविरोधातील तक्रारीची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे.
श्री चौधरी यांनी आपल्या तक्रारीत विकास कामांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता तांत्रिक मान्यता देणे, निकृष्ट दर्जाच्या कामांना मंजुरी देणे, अपूर्ण कामांवर मोजमाप पुस्तिका (एम.बी.) मंजूर करणे तसेच ऑनलाइन नोंदी व प्रत्यक्ष स्थितीमध्ये तफावत असल्याचे गंभीर आरोप केले होते.
सार्वजनिक निधीच्या वापराबाबत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशीचे आदेश दिल्याने संबंधित प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, चौकशी अहवालानंतर दोषी आढळणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे ग्रामस्थ आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments